

अनाक्कम्पोयिल-मेप्पडी बोगदा प्रकल्पाजवळ मोठी दरड कोसळली.
मुसळधार पावसामुळे घडलेल्या या दुर्घटनेत अनेकजण अडकल्याची भीती
स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत तीन कामगारांची सुरक्षित सुटका केली.
देशभरात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. या जोरदार पावसामुळे घाट रस्त्यावर दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीजवळील कल्लाडी येथेही दरड कोसळली असून यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्ती केली जातेय. यातील तीन कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यांना जोडणाऱ्या 'अनाक्कम्पोयिल-मेप्पाडी' बोगदा प्रकल्पाजवळ ही दुर्घटना घडली आहे.
मीनाक्षी पुलाजवळ अनाक्कम्पोयिल-मेप्पाडी' बोगद्याचे काम चालू आहे. या बोगद्याजवळ दरड कोसळली असून त्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जातेय. भूस्खलनानंतर कल्पेट्टा येथील अग्निशमन व बचाव दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन व बचाव दल, पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकांकडून शोध व बचाव कार्य राबवले जात आहे, अशी माहिती तेथील एका अधिकाऱ्याने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक रहिवाशांनी त्या ठिकाणाहून तिघांची सुटका केली आहे. बोगदा प्रकल्पावर काम करणारे कामगार राहत होते. बाधित परिसरात काही घरे आणि होमस्टे देखील आहेत. मंत्री टी. सिद्दीक आणि वायनाडचे जिल्हाधिकारी बचाव कार्यावर देखरेख करत आहेत आणि आणखी काही लोक अडकले आहेत का, याची महिती घेत आहेत. मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यांमधील दळणवळण वाढवावे यासाठी 'अनाककोम्पोयिल-मेप्पाडी' बोगदा बांधला जातोय.
जुलै २०२४ मध्ये वायनाडमध्ये विनाशकारी भूस्खलनाची घटना घडली होती. त्यावेळी मुसळधार पावसामुळे मेप्पाडी भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्या दुर्घटनेत ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, अनेकजण बेपत्ता झाले आणि चुरलमाला व मुंडक्कईसारख्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.