

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकबाबत महत्वाची अपडेट समोर
नव्या मार्गामुळे वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका
नव्या मार्गावर मागील दहा दिवसांत एकाही अपघाताची नोंद नाही
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाची देशभर चर्चा होत आहे. ६७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे मुंबई-पुणेकरांचा प्रवास सुकर होऊ लागला आहे. नव्या मिसिंग लिंकमुळे वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. अनेक प्रवाशांची ३०-४५ मिनिटांची बचत होऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत १ मे रोजी उदघाट्न झालेल्या मिसिंग लिंकविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हलक्या वजनाचे ७० टक्के वाहने मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरून जात आहेत. त्यामुळे मागील १० दिवसांत मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटातील वाहतूक कोंडी नाहीशी झाली आहे. सुट्ट्यांच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी देखील कमी झाल्याचे दिसून येत आहे. एक्स्प्रेसवरील उर्वरित ३0 टक्के जड वाहने बोरघाटाचा वापर करत आहेत. त्यामुळे बोरघाटात कोणतीही वाहतूक कोंडी झालेली नाही. उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंत बोरघाटातील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
खोपोली ते कुसगाव जोडणारा १९.८४ किलोमीटर लांबीचा हा मार्ग १ मे २०२६ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मिसिंग लिंक प्रकल्पासाठी एकूण ६७०० कोटी रुपये खर्च झाला. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर ६ किलोमीटरने कमी झालं आहे. त्यामुळे वाहनधारकांची तब्बल ३० मिनिटांची बचत होत आहे.
नव्या मार्गावर चढ-उतार नसलेला सपाट रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गावर ५.८६ किलोमीटरचा ८ पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या घाटमार्गावरील उतारांमुळे निर्माण होणे धोके देखील कमी झाले आहेत.
मुंबई-पुणे मिसिंग प्रकल्पाच्या कामाला २०१९ साली सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ७ वर्षांचा कालावधी लागला. लोणावळा आणि खंडाळासारख्या वाहतूक कोंडीच्या भागांना बायपास करून महामार्गावर दररोज १.५ लाख वाहने येजा करू शकतात. मागील १० दिवसांत एकही अपघाताची नोंद झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.