आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांच्या होमटाऊन असलेल्या चित्तूरमध्ये एका पत्रकाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. जगनमोहन रेड्डी असे मृताचे नाव असून, ते एका नामांकित तेलगू दैनिकात कार्यरत होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जगनमोहन रेड्डी हे मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांच्या टोळीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी जगनमोहन धावत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली. या कृत्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या व्ही. कोटा या शांत शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पालमनेरचे डीएसपी डेगाला प्रभाकर यांनी फॉरेन्सिक आणि तपास पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या हत्येच्या निषेधार्थ पत्रकार संघटना आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
चित्तूरचे पोलीस अधीक्षक (SP) तुषार डुडी यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाच्या तपासासाठी सहा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. हल्लेखोरांची संख्या अंदाजे १० असल्याचे समजते. त्यांच्यासोबत कोणाचा काही वैयक्तिक वाद होता का? याचा देखील तपास केला जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. स्थानिक पत्रकारांच्या मते, या हत्येमागे थमीम नावाच्या एका कुख्यात गुंडाचा हात असण्याची शक्यता आहे. जगनमोहन रेड्डी हे गेल्या काही काळापासून चंदनासह इतर तस्करीच्या प्रकरणांवर सातत्याने बातम्या लिहित होते. या बातम्यांमुळेच तस्करीमध्ये सामील असलेल्या थमीम आणि त्याच्या टोळीने ही हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.