दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातील तरुणाई सामील झाली असून जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा सीजेपी आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान या आंदोलनाचे पडसाद लोकसभेत देखील उमटले. अधिवेशन सुरू होताच विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरू झाल्याने आज देखील दिवसभरासाठी राज्यसभा आणि लोकसभेचे काम तहकूब करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध आता सोशल मीडियावर देखील व्यक्त केला जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते हे जंतर मंतरवर दाखल झाले आहेत.
जंतर-मंतरवर जात असताना राहुल गांधी, प्रियांका गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच विरोधी बाकावरील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडला. यावेळी त्यांनी मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अभिजीत दीपके यांची भेट संवाद साधला. सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना डिटेन केलेय एकप्रकारे. आमच्या मागण्या आहे की विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. दिल्ली आणि मुंबईमधील. तसेच प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपये द्यावे, सर्व आंदोलकांवरील देशातील एफआयआर मागे घ्यावे आणि वांगचुक यांना सोडा. ही आमची मागणी आहे. असे यावेळी अभिजीत दीपके यांनी शरद पवार यांना म्हटले आहे.
दरम्यान शरद पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्रात 30 महत्वाच्या जिल्ह्यात आंदोलन झाले. कोणताही कॉल नसताना हे आंदोलन झाले. तुम्हाला काय मदत पाहिजे, तसेच तुम्ही किती दिवस आंदोलन करणार आहात? असा प्रश्नही यावेळी शरद पवार यांनी दीपके यांना केला. यावेळी दीपके म्हणाले की, 31 दिवसांपासून इथे आहे. एक महिना झाला. काल जे झाले त्यामुळे सरकारचा राग आला आहे. आम्ही काय मागत होतो. आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होतो, असे दीपके यांनी म्हटले.
तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी देखील आंदोलकांची भेट घेतली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांनी देखील अभिजीत दीपके यांची भेट घेतली. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील भेट घेतली. या आंदोलनाला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भेट दिल्याने सीजेपीची ताकद वाढली असून मोदी सरकार झुकणार का? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.