

गुजरातमध्ये शाळेत ९वीतील विद्यार्थिनीने मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला केला
आरोपीने मैत्रिणीचा गळा दाबून चाकूने हातावर वार केला
गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरु
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला
गुजरातच्या तापीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका नामांकित शाळेतील ९वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या जवळच्या मैत्रिणीचा गळा दाबून आणि चाकूने हल्ला करत हत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पीडित मुलीचा जीव वाचला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. तसेच मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या तापी जिल्ह्यातील वलोड भागातील एका नामांकित शाळेत चालू लेक्चरमध्ये दोन मैत्रिणींचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की आरोपी मुलीने आपल्या मैत्रिणीला बाथरूममध्ये नेलं. तिथे तिच्या कपड्यांना डाग लागल्याचा बहाणा केला. याचवेळी आरोपी मुलीने मैत्रिणीचा गळा दाबला आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र पीडित तरुणीचा गळा दाबल्याने ती घुसमटली आणि जिवंत राहिली. हे पाहून आरोपीने चाकू काढला आणि थेट तिच्या हातावर हल्ला करत तिची नस कापली. या दरम्यान पीडित मुलगी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि बेशुद्ध झाली. मैत्रीण बेशुद्ध झाल्याचे पाहून आरोपी मुलीने घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर काही विद्यार्थिनींनी याबाबत शिक्षकांना माहिती दिली असता विद्यार्थिनीला तातडीने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, शाळेकडून फोन आल्यानंतर त्यांना मुलगी जखमी झाल्याची माहिती मिळाली. मुलीनेही मैत्रिणीने बहाणा करून बाथरूममध्ये नेल्याचे आणि त्यानंतर हल्ला केल्याचे सांगितले. तापीचे डीवायएसपी प्रमोद नरवाडे यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात दोन विद्यार्थिनींमध्ये मैत्रीच्या कारणावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अल्पवयीन असल्याने तिच्यावर बाल न्याय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.