भाजपचे आमदार तथा विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह 100 भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रखंडातील मंगरोडीह ग्रामपंचायतीचे पंचायत सचिव तसेच एफएसटी अधिकारी मो. मन्सूर यांच्या तक्रारीवरून नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. झारखंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता निवडणुकीमध्ये मोठ्या जमावासह बैठक घेणे हे आदर्श आचारसंहितेचे थेट उल्लंघन आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मात्र बाबूलाल मरांडी यांनी पत्रकारांशी बोलताना आपण फक्त हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो होतो, कोणतीही बैठक घेतली नव्हती, असा दावा केला आहे.
21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत फोनवरून माहिती प्राप्त झाली. तसेच निवडणूक प्रतिनिधी प्रवीण मेहरा यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे बस पडाव, गिरिडीह येथील एचपी पेट्रोल पंपाजवळील मां काली हॉटेल येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये बाबूलाल मरांडी आणि त्यांचे सुमारे 80-100 समर्थक बैठक घेताना आढळल्याचा आरोप आहे. हॉटेल परिसरात 15-20 वाहने उभी होती. या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि छायाचित्रेही घेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 21 फेब्रुवारी हा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. अशा वेळी कोणतीही परवानगी न घेता मोठा जमाव जमविणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते, असे त्यांच्या विरोधकांनी म्हटले आहे.
ज्या ‘मां काली हॉटेल’मध्ये ही बैठक झाल्याचा आरोप आहे, ते हॉटेल भाजप कार्यकर्ता सिंकू सिन्हा यांचे आहे. सिंकू सिन्हा यांच्याविरुद्धही निवडणुकीदरम्यान बीएनएसएस कलम 163 चे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनुमंडल पदाधिकारी, गिरिडीह यांनी 27 जानेवारी 2026 रोजी जारी केलेल्या आदेश क्रमांक 77 नुसार बीएनएसएस कलम 163 लागू करण्यात आले आहे. तरीही 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर 80-100 लोक बेकायदेशीरपणे जमून बैठक घेत असल्याचे आढळले. ऐन निवडणुकीत भाजपच्या आमदारासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.