E20 पेट्रोल… नाव तर ऐकलंच असेल! काही दिवसांपूर्वी जंतर-मंतरवरील उपोषण, आंदोलनं आणि ‘Gen-Z’ च्या आंदोलनांमध्ये हे नाव चर्चेतून बाजूला पडलं होतं. पण आता पुन्हा एकदा इथेनॉल ब्लेंडेड फ्यूल चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. आधी NEET पेपर लीक प्रकरणावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ने सरकारला घेरलं आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आता सोशल मीडियावर ‘E20 जनता पार्टी’ नावाचा नवा डिजिटल अभियान गाजत आहे. यांची एकच मागणी आहे देशातील नागरिकांना E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा पर्यायही मिळावा. मीम्स, टोमणे आणि प्रश्नांच्या माध्यमातून सुरू झालेलं हे अभियान आता पेट्रोल पंपांपासून सरकारच्या इंधन धोरणापर्यंत मोठी चर्चा निर्माण करत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, ‘E20 जनता पार्टी’ स्वतःला नागरिकांच्या वतीने चालवला जाणारा कंझ्युमर राईट्स कॅम्पेन असल्याचं सांगते. या अभियानासाठी ‘X’ वर स्वतंत्र हँडलही तयार करण्यात आलं आहे. या ग्रुपचं म्हणणं आहे की इंधन धोरणात पारदर्शकता, अचूक माहिती आणि ग्राहकांच्या निवडीचा सन्मान असणे गरजेचे आहे. जसे इतर उत्पादनांमध्ये ग्राहकांना पर्याय दिले जातात, तसेच पेट्रोल खरेदी करतानाही ग्राहकांना पर्याय मिळायला हवा.
‘E20 जनता पार्टी’ची मुख्य मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, ते कोणत्याही सबसिडीची, मोफत इंधनाची किंवा इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल बंद करण्याची मागणी करत नाहीत. त्यांना फक्त ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इंधन निवडण्याचा अधिकार हवा आहे. तसेच अनेक वाहनधारकांनी E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होणे, इंजिनमध्ये बिघाड, देखभाल खर्च वाढणे आणि दीर्घकालीन परिणाम याबाबत चिंता व्यक्त केल्याचे या ग्रुपने सांगितले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या इंधनावर स्पष्ट लेबलिंग असावी, वेगवेगळ्या फ्यूल ब्लेंडचे फायदे-तोटे जाहीर करावेत, मायलेज, प्रदूषण, इंजिनवरील परिणाम आणि मेंटेनन्स खर्च यावर स्वतंत्र संशोधन करून त्याचे अहवाल सार्वजनिक करावेत, अशीही त्यांची मागणी आहे.
‘E20 जनता पार्टी’चा अंदाज बऱ्याच अंशी ‘कॉकरोच जनता पार्टी’सारखाच आहे. सोशल मीडिया, मीम्स आणि व्यंगाच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हा या दोन्ही अभियानांचा समान धागा आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सुरुवात मे 2026 मध्ये सटायर कॅम्पेन म्हणून झाली होती, पण नंतर NEET पेपर लीक प्रकरणामुळे ते मोठ्या आंदोलनात रूपांतरित झाले. देशभरातील विद्यार्थी आणि संघटनांनी त्यात सहभाग घेतला.
‘E20 जनता पार्टी’नेही याच पद्धतीचा अवलंब केला आहे. अभिजीत दिपके यांच्या 16 मेच्या पोस्टचा संदर्भ देत या ग्रुपने विचारलं, “जर सर्व बाईक आणि कार मालक एकत्र आले तर काय होईल?” याआधी दिपके यांनी “जर सर्व कॉकरोच एकत्र आले तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच धर्तीवर हे अभियान लोकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या ‘E20 जनता पार्टी’ कोणतीही औपचारिक संघटना नाही. याचा कोणताही अधिकृत संस्थापक किंवा मोठ्या स्तरावरील रस्त्यावरचा आंदोलनात्मक कार्यक्रम नाही. हे पूर्णपणे डिजिटल अभियान असून ‘X’ आणि इंस्टाग्रामवर झपाट्याने लोकप्रिय होत आहे. बातमी लिहेपर्यंत ‘X’ वर या हँडलला सुमारे 13,000 हून अधिक फॉलोअर्स, तर इंस्टाग्रामवर सुमारे 8,800 हून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.