

लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याची चर्चा आहे.
लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांची संख्या
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या राजकीय समीकरणांवर परिणाम
केंद्र सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकातील प्रस्तावानुसार, सर्व राज्यांच्या लोकसभेच्या जागांमध्ये सरसकट 50 टक्क्यांची वाढ होणार आहे. हे विधेयक पारित झाल्यास लोकसभेतील खासदारांची संख्या सध्याच्या ५४३ वरून वाढून सुमारे ८५० इतकी होईल. त्याचवेळी महिलांना 33 टक्के आरक्षण (Women Reservation Bill) देण्याचं विधेयकही मांडण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनात सरकार १३१ वी घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडणार आहे.
या विधेयकात लोकसभेतील जागांची संख्या ५४३ वरून ८६० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हे पाऊल महिला आरक्षणाची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी उचलले जातंय. मात्र, विरोधी पक्षांचा आरोप आहे की, याचा खरा उद्देश महिला आरक्षण नसून, मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या (डीलिमिटेशन) प्रक्रियेचा वापर करून स्वतःच्या फायद्यासाठी मतदारसंघांच्या सीमा पुन्हा निश्चित करणे. जेणेकरून एनडीएची (NDA) सत्ता अधिक बळकट करणे हा आहे.
हे टाळण्यासाठी विरोधकांनी एकजूट राहणे आवश्यक आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक संख्याबळ विरोधी पक्षांकडे आहे, परंतु ही संख्या तेव्हाच ताकदीत रूपांतरित होऊ शकेल जेव्हा विरोधी पक्ष एकजुटीने राहतील. एप्रिल महिन्यात, याच एकजुटीच्या बळावर त्यांनी सरकारला ५४ मतांच्या फरकाने रोखून धरले होते. आता त्याच एकजुटीची पुन्हा एकदा परीक्षा होणार असल्याचं विरोधपक्षांनी या विधेयकाला विरोध करताना म्हटलंय.
जर इंडिया आघाडी यावेळीही एकजूट राहिली तर एनडीएला विधेयक पारित करण्यासाठी लागणारे दोन तृतीयांश बहुमत साध्य करणं अवघड होईल. जर इंडिया आघाडीत तडा पडला, तर सरकार केवळ एखाद्या विशिष्ट विधेयकावर विजय मिळवेल असे नाही, तर त्यांना विरोधकांना फोडण्याचं सूत्रही भाजपच्या हाती लागेल.
डिलिमिटेशनचा परिणाम पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. तसेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीवरही याचा प्रभाव पडेल. इतकेच नव्हे, तर भविष्यातील राजकारणाच्या संपूर्ण रचनेवरही याचा परिणाम होईल. म्हणूनच हे अधिवेशन केवळ एका विधेयकाची परीक्षाच नाही, तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठीची एक पूर्वतयारीही आहे.
२०२७ मध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. ' मतदारसंघ पुनर्रचना विधेयक' (Delimitation Bill) चा परिणाम २०२९ च्या लोकसभा निवडणुकांवरही होण्याची शक्यता आहे. जरी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक (२०२६) मंजूर झाले, तरी त्याचा २०२७ च्या विधानसभा निवडणुकांमधील जागांच्या संख्येवर किंवा आरक्षणाच्या कोट्यावर कोणताही परिणाम होणार नाही; मात्र, २०२९ च्या लोकसभा निवडणुकांवर त्याचा निश्चितपणे थेट परिणाम होईल.
एखादे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागतो. सध्याची परिस्थिती पाहता २०२७ च्या निवडणुकांपूर्वी हे शक्य नाही. म्हणूनच उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील २०२७ च्या विधानसभा निवडणुका, विद्यमान मतदारसंघांच्या आणि सध्याच्या सीमांच्या आधारावरच घेतल्या जातील. दुसरीकडे आगामी विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षित नसणार आहे. या परिस्थितीत, सीमांकन विधेयकाअंतर्गत जागांच्या संख्येत होणारी कोणतीही वाढ २०२७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये नव्हे, तर थेट २०३२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये या राज्यांना फायदेशीर ठरेल.
२०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण पहिल्यांदाच लागू केले जाईल. सुधारित विधेयकात, भारत सरकारने डिलिमिटेशनला २०२७ च्या जनगणनेच्या प्रतीक्षेतून वेगळे केले असून, त्याऐवजी २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीचा आधार घेतला आहे. या परिस्थितीत, आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना (डीलिमिटेशन) प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि देशात पहिल्यांदाच लोकसभेच्या एक तृतीयांश (३३टक्के) जागा महिलांसाठी राखीव असतील. यासह देशात पहिल्यांदाच सध्याच्या ५४३ जागांऐवजी सुमारे ८१५-८१६ जागांसाठी निवडणुका घेतल्या जातील. तसेच, लोकसभेच्या एकूण जागांच्या संख्येत ५०टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावामुळे, सुमारे २७२ जागा महिलांसाठी राखीव असतील.
सरकारच्या या नव्य प्रस्तावानुसार सर्व राज्यांच्या खासदारांच्या संख्येत सरसकट ५० टक्क्यांची वाढ होणार आहे. महाराष्ट्रात सध्या ४८ खासदार असून नव्या विधेयकानुसार ती संख्या ७२ पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे राज्यात २४ नवे खासदार वाढणार आहेत. या ७२ जागांपैकी २४ जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले की, गेल्यावेळी लोकसंख्येच्या आधारे लोकसभेच्या जागा वाढण्यांबद्दल डी लिमिटेशनला राष्ट्रवादी आणि डीएमकेचा विरोध होता.
गेल्या वेळी बहुमत न मिळाल्यामुळे डिलिमिटेशनचा मुद्दा मागे पडला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशातील अनेक छोट्या मोठ्या पक्षांना एकत्रित केलंय. काही राज्यात लोकसंख्या वाढल्यामुळे आणि काही राज्यात खासदार वाढल्यामुळे यावर विपरीत परिणाम होईल असं राष्ट्रवादी पक्षाला वाटत होतं.परंतु खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यापूर्वी सांगितलं होतं की 50% जर जागा वाढणार असतील तर आम्ही या विधेयकाला पाठिंबा देतो. त्या पद्धतीचा निर्णय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलाय.
आज आपल्या राज्यात ४८ जागा असतील तर त्या ठिकाणी ७२ जागा होणार आहेत. आपल्याकडे २४× ६ अशा पद्धतीने विधानसभेच्या जागा वाढतील. यामध्ये एससी , एसटी, त्याच बरोबर सर्व आरक्षण आणि महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. त्यांना आमदार, खासदार होण्याची संधी मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.