

दिल्लीमध्ये सीसीटीव्ही लावताना भीषण अपघात
भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली
अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले
तिघांनी जागीच प्राण सोडले
दिल्लीमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. रविवारी पहाटे भरधाव ट्रकने ६ जणांना चिरडलं. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात सरिता विहार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोड नंबर ३ वर झाला. सेफ सिटी प्रोजेक्टअंतर्गत या रस्त्यावर सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू होते. याचवेळी नोएडावरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या क्रेन आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की तिघांनी जागीच प्राण सोडले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षामध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची टीम बसली होती. त्याचवेळी भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे ऑटो रिक्षाचा चुराडा झाला. या रिक्षामध्ये बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये संगम विहार येथे राहणारा २३ वर्षीय उमेश आणि ३५ वर्षीय प्रवीण यांचा मृत्यू झाला. तर कंपनीचे एचआर मॅनेजर सूरज यांचा देखील या दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये संगम विहार येथील रहिवासी २० वर्षीय आकाश आणि २६ वर्षीय अनूप, तसेच रोहिणी येथील रहिवासी असलेले ४० वर्षीय खेम सिंग हे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिस ट्रक चालकाचा शोध घेत असून संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. ते अपघाताच्या वेळी ट्रकचा वेग आणि अपघाताच्या सभोवतालच्या परिस्थितीचाही तपास करत आहेत. सध्या पोलिस घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या अपघातामध्ये ज्या ३ जणांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.