

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असतानाच बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवामान बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दबावाचं क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र सोमवारी आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात पावसाचा जोर वाढू शकतो.
हे दबावाचं क्षेत्र पुढे ‘अर्नब’ नावाच्या चक्रीवादळात बदलणार का, याबाबत सध्या निश्चित माहिती नाही. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) याबाबत अद्याप अधिकृत इशारा देण्यात आलेला नाही. जर या दबावाचं चक्रीवादळात रूपांतर झालं तर ‘अर्नब’ हे यंदाचं पहिलं चक्रीवादळ ठरू शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या हे दबावाचे क्षेत्र उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आहे. त्याची दिशा पश्चिम आणि वायव्येकडे आहे. सोमवारी हे क्षेत्र पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात गंभीर दबावाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे. यानंतर बुधवारी सकाळी हे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकून बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि उत्तरेकडील भागात पोहोचण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये या संभाव्य चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केलीये. हा परिणाम शुक्रवारपर्यंत राहू शकतो. सध्या दबावाचे क्षेत्र उत्तर आंध्र प्रदेशचा किनारा आणि दक्षिण ओडिशाच्या दिशेने सरकत असल्याचं सांगण्यात येतंय. पश्चिम बंगालमध्ये सोमवारी कमी पाऊस पडू शकतो.
मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बुधवार ते शुक्रवार या काळात काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मिदनापूर या भागांना याचा विशेष फटका बसण्याची शक्यता आहे.
याशिवाय दक्षिण 24 परगणा, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, पश्चिम वर्धमान, बीरभूम, मुर्शिदाबाद, पुरुलिया आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
सोमवारी उत्तर बंगालमध्ये तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मालदा, उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण दिनाजपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुधवार आणि गुरुवारी जलपाईगुडी आणि दार्जिलिंगमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी जलपाईगुडीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.
शनिवारी दार्जिलिंग, कालिम्पोंग, जलपाईगुडी आणि उत्तर दिनाजपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या या दबावाच्या क्षेत्राची नेमकी ताकद आणि त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे अर्नब चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचा परिणाम किती मोठा असेल, याचा अंदाजही अद्याप स्पष्टपणे सांगता येत नाही.
स्कायमेटने 18 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल हे संभाव्य चक्रीवादळाच्या प्रभावाखाली येऊ शकतात. मात्र, या तिन्ही राज्यांमध्ये त्याचा मोठा परिणाम होईल की नाही, हे अद्याप निश्चित नसल्याचेही सांगण्यात आले होते.
दरम्यान, देशातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासालाही सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून मॉन्सून माघारी फिरू लागला आहे.
IMDच्या अंदाजानुसार, 25 ते 28 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो. राज्याच्या इतर भागांतही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.