मुंबई लोकलमध्ये दारू पिऊन प्रवास कराल तर बसेल दंड
दारू पिऊन प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई
रेल्वे स्थानके आणि लोकल डब्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार
संजय गडदे, मुंबई
आता मुंबई लोकलमध्ये दारू पिऊन प्रवास करत असाल किंवा धिंगाणा घातला तर तुमची काही खैर नाही. कारण मुंबई लोकलमध्ये नुकत्याच घडलेल्या २२ वर्षीय तरुणाच्या हत्येच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. रेल्वे डब्यांमध्ये दारूच्या नशेत प्रवास करणारे, इतर प्रवाशांशी वाद घालणारे तसेच गोंधळ निर्माण करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून दारू पिऊन प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह न्यायालयीन प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे.
मुंबईची लोकल ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो नागरिक कामानिमित्त, शिक्षणासाठी आणि विविध कारणांसाठी लोकलने प्रवास करतात. मात्र गेल्या काही महिन्यांत रेल्वे परिसरात आणि लोकल डब्यांमध्ये प्रवाशांमध्ये वाद, भांडणे आणि मारहाणीच्या घटना वाढल्याचे समोर आले आहे. काही प्रवासी नशेत प्रवास करत धिंगाणा घालतात, याने उपस्थित प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते.
या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांनी 'ड्रंक अँड ट्रॅव्हल' विरोधात मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. रस्त्यांवर ज्या पद्धतीने 'ड्रंक अँड ड्राइव्ह' सारख्या कारवाया केल्या जातात, तशाच आता रेल्वे स्थानके आणि लोकल डब्यांमध्ये तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. संशयित प्रवाशांची तपासणी करून मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
लोहमार्ग एसीपी मनीषा रावखंडे यांनी सांगितले की, लोकल प्रवास सुरक्षित आणि सुरळीत ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रवास केल्याने केवळ स्वतःचाच नव्हे तर इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. तरुणांमध्ये वाढत असलेली बेफिकीर वर्तणूक आणि मद्यपानाच्या सवयींमुळे गंभीर घटना घडू शकतात. त्यामुळे कुटुंबीयांनीही जबाबदारीने वागून मुलांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.