बुलढाण्यात महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच मागितली
एसीबीकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू
बुलढाणा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील एका संरक्षण अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या दिव्यांग मुलीसाठी शासनाच्या क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या बदल्यात लाचेची मागणी केल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर आहे. या कारवाईमुळे सरकारी योजनांच्या लाभासाठी नागरिकांकडून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या दिव्यांग मुलीला क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला होता. या लाभाची रक्कम मिळवून देण्यासाठी तसेच भविष्यातही योजनेचे आर्थिक लाभ सुरू ठेवण्यासाठी महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी तुषार रमेश राणे यांनी तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जळगाव जामोद येथील तालुका शेतकरी खरेदी-विक्री सहकारी समिती कार्यालयासमोर कारवाई करण्यात आली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने लाचेच्या रकमेतील १२ हजार रुपयांचा पहिला हप्ता तुषार राणे यांना दिला.
ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून संबंधित अधिकाऱ्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपासही सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.