महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मेट्रो विस्तार आणि पायाभूत सुविधांवर मोठा भर
मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये नवीन मेट्रो मार्गिका आणि रेल्वे कॉरिडॉरची घोषणा
ग्रामसडक योजनेची उर्वरित कामे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन
नागपूरमध्ये नवीन वित्तीय केंद्र आणि रिंगरोड प्रकल्पाला मान्यता
Maharashtra Budget Devendra Fadnavis Announcement राज्यातील नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात विविध रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक निधी तसेच पुणे, मुंबई, नागपूर मेट्रोबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर २०२६ पर्यंत ग्रामसडक योजनेअंतर्गत सगळी कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन आरामदायी प्रवास उपलब्ध होणार आहे.
आतापर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये १७३ किमीच्या मेट्रो मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या असून, आगामी वर्षात आणखी ५० किमीच्या मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यामध्ये वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या २३,४८७ कोटी रुपये खर्चाच्या पूर्णतः भूमिगत मार्गिकेचा समावेश असून, तिचा विस्तार वांद्रे स्टेशनपर्यंत केला जाणार आहे. तसेच मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो ८ या २२,००० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे कामही हाती घेतले जाणार आहे. तसेच मुंबईच्या उपनगरीय भागात बदलापूर-कर्जत, आसनगाव-कसारा आणि पनवेल-वसई दरम्यान ६९ किमी लांबीचे नवीन रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील ठाणे ते तलासरी तीन स्थानकांचे काम फेब्रुवारी,२०२७ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
पुण्यात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढताना पाहायला मिळत आहे. यावर उपाय म्हणून आजच्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रो २ ची घोषणा करण्यात आली आहे. खडकवासला - स्वारगेट - हडपसर -खराडी मार्गावर हडपसर ते लोणी - काळभोर व हडपसर बस डेपो ते सासवड या दोन उपमार्गिकांना आजच्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे.
नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर या नावाने व्यापार आणि वित्तीय केंद्र विकसित करणार असून, नागपूर शहराच्या विस्तार आणि विकासाला चालना देण्यासाठी नागपूर रिंगरोडला महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पादरम्यान मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नागपूरचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार आहे.
आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिला टप्प्याचं काम ९७ टक्के झाल्याचे म्हटले आणि उर्वरित काम २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दुसरा टप्पा पूर्ण झाला असून आजच्या अर्थसंकल्पात तिसऱ्या टप्प्यातील २३,००० किमी रस्ते आणि पुलांच्या कामांची घोषणा करण्यात आली. तसेच शेतपाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाची कामे जलदगतीने करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना राबवण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.