संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई: अमूल, गोकुळ यांसारख्या नामांकित दूध कंपन्यांच्या नावाने बनावट दूध पिशव्या तयार करून त्यामध्ये भेसळयुक्त दूध भरून विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष-१२च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आतापर्यंत चार पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात बनावट दूध पिशव्या, भेसळयुक्त दूध, मशिनरी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 2021 पासून अमूल ब्रँडच्या पिशव्या छापून त्याद्वारे तब्बल 20 लाख लिटर भेसळयुक्त दूध विक्री केल्याचे तपासातून समोर आले आहे.
दहिसर हद्दीतील एका इसमाकडून नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून भेसळयुक्त दूध नागरिकांना वितरित केले जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार ९ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखा कक्ष-१२च्या पथकाने दहिसर पूर्व परिसरातील राजेश कंपाउंड येथे छापा टाकला.
कारवाईदरम्यान अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि गोकुळ कंपनीच्या मूळ दूध पिशव्या कात्रीने कापून त्यातील दूध काही प्रमाणात काढले जात होते. त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून पिशव्या पुन्हा सील करण्यात येत होत्या. त्यानंतर हे दूध नामांकित कंपनीचे प्रमाणित दूध असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करून विक्री करण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत भेसळयुक्त दूध तसेच दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान या प्रकरणात बनावट दूध व बनावट प्लॅस्टिक पिशव्या विक्री करणारे आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले.
तेलंगणातून मुख्य आरोपी भिक्षमया गंटा याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर या भेसळीचा उलगडा झाला.अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीत या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटसमोर, बाबुभाई शहाणी कंपाउंड, वालीव फाटा, वसई पूर्व, जिल्हा पालघर येथील ठिकाणी छापा टाकण्यात आला. या ठिकाणी अमूलसारख्या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट दूध पिशव्या तयार करणारा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले. बनावट पिशव्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मशिनरी व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले असून मशिनरीची अंदाजे किंमत १० लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार मुख्य आरोपी सन २०२१ पासून मुंबई व मुंबई उपनगरात भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या बनावट पिशव्या तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासाची पाळेमुळे शेवटपर्यंत शोधत पोलिसांनी बनावट पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे ४७० लिटर दूध, १३ हजार बनावट रिकाम्या दूध पिशव्या व प्लॅस्टिक साहित्य, दूध भेसळीसाठी आवश्यक साधनसामग्री, बनावट पिशव्या तयार करण्यासाठीची मशिनरी तसेच चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या बनावट दूध रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
दूध भेसळ प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये १) भिक्षमया गंटा (रा. दहिसर पूर्व), २) सैदुलु जंगिली (रा. कुरार ईस्ट), ३) यदय्या बतुल्ला (रा. कुरार ईस्ट) आणि ४) रामुलु बोडुपल्ली (रा. अंधेरी पूर्व - मूळ तेलंगणा) या आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणात एकूण ४ पुरुष आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई आणि यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत कक्ष-12 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील, बाळासाहेब राऊत(पोलीस निरीक्षक), पूजा खांडेकर (पोलीस निरीक्षक), विजय रासकर (पोलीस निरीक्षक) समीर मुजावर (सपोनी) युवराज चव्हाण (सपोनी) किरण कोते (पोलीस उपनिरीक्षक), अजय सावंत (पोलीस उपनिरीक्षक) व कक्ष 12 येथील पोलीस पथक यांनी पार पडलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.