रोहिदास घाडगे, साम टीव्ही
पुणे: चाकण आणि पिंपरी-चिंचवड या प्रमुख ओद्योगिक क्षेत्रांतील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे अपघातांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी 2025 ते जुलै 2026 या अवघ्या 20 महिन्यांच्या कालावधीत अपघातांमध्ये 580 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे अध्यक्ष दिलीप बटवाल यांनी दिली आहे.
औद्योगिक क्षेत्राचा ज्या वेगाने विस्तार झाला, त्या प्रमाणात रस्ते, उड्डाणपूल आणि वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास झाला नाही. रस्त्यांवरील खड्डे, अरुंद रस्ते आणि दररोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे येथे दररोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे येथे काम करणाऱ्या लाखो कामगारांच्या तसेच स्थानिक नागरिकांच्या जिवाला रोजच धोका निर्माण होत आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारी दरबारी शेकडो अर्ज सादर केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या, मात्र तरीही ठोस विकासकाम झाले नसल्याची खंत दिलीप बटवाल यांनी व्यक्त केली.
औद्योगिक पट्ट्यात दररोज हजारो अवजड वाहने आणि कामगारांच्या दुचाकींची ये-जा असते. मात्र, योग्य नियोजन नसल्याने आणि रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने अपघातांची मालिका सुरुच आहे. केवळ निवेदने देऊनही राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने उद्योजक आणि कामगारांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
चाकण आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डेमुक्ती आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने विशेष निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अन्यथा येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल, असा इशाराही उद्योजकांकडून दिला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.