Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Mumbai Local train commuters issue : नवी मुंबईत एका प्रवाशाला चौघांनी लोकल ट्रेनमधून ढकलल्याचा प्रकार घडला. या सर्व वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमधील सहनशीलता संपत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
local train issue
local train issue Saam tv

मुंबई :

मुंबई शेजारील कर्जत, कसारा, बदलापूर , आसनगाव, टिटवाळा, वसई, विरार, पालघर, पनवेल या भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढलं आहे. मुंबईच्या तुलनेत घरांच्या किंमती कमी असल्याने मागील १० वर्षात या भागात नागरिकांचा ओढा वाढला आहे. मात्र, या भागातील लोकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी लोकल ट्रेनशिवाय इतर पर्याय सक्षम नसल्याने बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या भागातील लोकांना लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दीतून नोकरी आणि इतर कामासाठी प्रवास करावा लागतो. त्यात मध्य रेल्वेच्या मार्गावर गेल्या काही दिवसांमध्ये लोकल ट्रेनमधील भयंकर गर्दीमुळे तीन जणांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या लोकल ट्रेनमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवाशाची हत्या झाल्याची घटना घडली. तर नवी मुंबईत एका प्रवाशाला चौघांनी लोकल ट्रेनमधून ढकलल्याचा प्रकार घडला. या सर्व वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमधील सहनशीलता संपत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पीक अवर्समध्ये लोकल फेऱ्या कमी

नोकरदार व्यक्ती रिक्षा, बस, खासगी वाहन आणि पायी रस्त्यावरील गर्दीतून मार्ग काढत रेल्वे स्टेशनवर पोहोचत असतो. सकाळच्या सुमारास पीक अवर्समध्ये रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतरच शेकडोच्या संख्येने प्रवासी उभे असतात. मध्ये रेल्वे मार्गावर पीक अवर्समध्ये ठाण्याच्या पुढे लोकल फेऱ्या कमी असतात. तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवलीपुढे लोकल फेऱ्या कमी असतात. त्यामुळे या भागातील प्रवाशांना गर्दीतून साधारण एक ते दोन तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर लोकल येताच प्रवाशांची सीटसाठी चढाओढ सुरु होते.

local train issue
Mumbai Local News | मुंबईत लोकलमधून पडून 139 जणांचा बळी, धक्कादायक माहिती समोर

लोकल गर्दीतून प्रवाशांचा उभा राहून प्रवास

लोकल डब्यातील सीट मोजक्या प्रवाशांच्या नशिबी असतात. त्यामुळे बहुतेक प्रवाशांना लोकलमध्ये उभे राहून कामाला जावं लागतं. त्यामुळे आजारी, वयोवृद्ध, महिला प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागतं. एक ते दोन तासांच्या प्रवासासाठी प्रवाशांमध्ये सीटवरून भांडणेही होतात. साधा धक्का लागला तरी प्रवासी एकमेकांना शिवीगाळ करून उद्धार करू लागतात. तर अनेक वेळा हाणामारी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यांचेही व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत.

local train issue
Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू

तांत्रिक बिघाड झाला किंवा लोकल ट्रेन उशिरा धावू लागल्यास प्रवाशांना धड दोन पायांवर उभे राहण्यासाठी जागा नसते. या प्रचंड गर्दीत प्रवाशांना श्वास घ्यायला देखील जड जातं. त्यामुळे लोकांना प्रवास करताना अक्षरश: नाके नऊ येतात. अशा गर्दीतून प्रवास करताना लोकलमधून कोसळून आतापर्यंत शेकडो जणांना जीव गमवावे लागले आहेत. मागील आठवड्यात तीन प्रवाशांना जीव गमवावे लागले आहेत. मागील काही वर्षांतील लोकलमधून पडून मृत्यूमुखी होणाऱ्या प्रवाशांची आकडेवारी धक्कादायक आहे.

local train issue
Local Train Viral Video : धावत्या रेल्वेत दुमदुमला सुर; तरुणीने मधुर आवाजात गायली गवळण, पाहा VIDEO

प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

नवी मुंबईतील हार्बर मार्गावर काही दिवसांपूर्वी कुमार लालजी दिवाकर या प्रवाशाला चौघांनी ट्रेनमधून ढकलून दिल्याचा प्रकार घडला होता. या घटनेत या प्रवाशाला हात गमवाला लागला होता. त्याचा पायही फ्रॅक्चर झाला. काही दिवसांपूर्वी, खडवली ते वाशिंददरम्यान धावत्या लोकलमध्ये काही गर्दुल्ल्यांनी चोरी उद्देशाने दत्तात्रय भोईर या प्रवाशाची धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. तर गेल्या वर्षी दिव्यांग डब्यात एका प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्ब्यांमध्ये गर्दुल्यांकडून तरुणी आणि महिलांचा विनयभंग झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

local train issue
Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

रेल्वे प्रवाशांचा सयंम सुटत चाललाय का?

सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या साध्या लोकल ऐवजी एसी लोकल सुरु झाल्याने गर्दी वाढू लागल्यांचं अनेकांचं म्हणणं आहे. वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांमध्ये चिडचिड आणि सयंम सुटत चालल्याची परिस्थिती दिसून येत आहे. या लोकल गर्दीचा राग प्रवासी एकमेकांवरून काढू लागले आहेत का, असे नानाविविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

या रेल्वे स्टेशनवर चोरीच्या घटनेतही वाढ होऊ लागल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे. तर रेल्वे स्टेशनवर होमगार्ड, रेल्वे पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे अशा घटना रोखता येऊ शकतात, अशीही प्रवाशांची मागणी आहे.

रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव काय म्हणाले?

कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी महासंघाचे अध्यक्ष राजेश घनघाव म्हणाले की, 'मागील आठवड्यात डोंबिवली ते दिवा-मुंब्रा दरम्यान तीन प्रवाशांचा गर्दीच्या वेळी प्रवास करताना मृत्यू झाल्याच्या अतिशय अस्वस्थ करणाऱ्या घटना घडल्या आहेत. आम्ही कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे अधिकाऱ्यांकडे प्रवासी संख्या वाढल्याने लोकल ट्रेन वाढाव्यात अशी सातत्याने मागणी करतोय. सीएसएमटी येथून कसारा-कर्जतसाठी लोकल ट्रेन सेवा वाढवता येत नसेल तर ठाणे,कसारा ठाणे,कर्जत असी शटल सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे'.

'प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष'

'सुरुवातीला पाचवी, सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यास, या मागणी नुसार लोकल ट्रेन वाढवू असे सांगण्यात आले होते. पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाली, मात्र कसारा-कर्जत लोकल सेवेचा बोजवारा उडाल्याचे तुम्ही पाहिले असेल. कसारा-कर्जत मार्गावर मेल एक्सप्रेस अधिक प्रमाणात जात असल्याने तिसरी, चौथी मार्गिका पूर्ण होईपर्यंत लोकल सेवा वाढविता येणार नाही, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे. मात्र याच मार्गावर 130 विशेष मेल एक्सप्रेस चालविल्या जातात. तसेच एसी लोकल ट्रेन आणि वंदे भारत चालविली जाते. आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने रोज मध्य रेल्वेच्या मार्गावर अनेक प्रवाशांचे अपघाती मृत्यू होत आहेत, असे घनघाव पुढे म्हणाले.

local train issue
Local train bogie derailed at CSMT: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकलचा डबा घसरला; हार्बर वाहतूक विस्कळीत

रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे काय म्हणाल्या?

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे म्हणाल्या की, ठाणे पुढील रेल्वे प्रवाशांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ही परिस्थिती सध्याची नाही. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. कित्येक वर्षांपासून आम्ही पाहतोय की, धावत्या ट्रेनमधून रोजीरोटीसाठी घराबाहेर पडणारा सर्वसामान्य प्रवासी लोकल ट्रेनमधून पडून जखमी किंवा मृत्यूमुखी होत आहे. या लोकल गर्दीवर तोडगा निघावा, यासाठी मागील अनेक वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत'.

'रेल्वे प्रवाशांच्या मागणीकडे सत्ताधारी आणि विरोधकांकडून दुर्लक्ष'

'रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने यावर तोडगा काढावा, साठी प्रयत्न करतोय. या प्रश्नाकडे गांभीर्याने घेतले जात नाही. यामुळे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे रेल्वे आणि राज्य शासनाने गांभीर्याने न पाहिलं नाही, तर लोकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल. या लोकलच्या गर्दीमुळे तरुण लोकलमधून पडून मृत्यूमुखी होत आहेत, यासारखं दुर्देव्य नाही. यावर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत १५० प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. याकडे सत्ताधारी आणि विरोधक याकडे लक्ष देत नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आहे, असं मत लता अरगडे यांनी व्यक्त केलं.

local train issue
Mumbai Local Train : ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी; जूनपर्यंत प्रत्येक डब्ब्यात असणार टॉकबॅक अन् सीसीटीव्ही

सामाजिक कार्यकर्त्या शितल गमरे काय म्हणाल्या?

सामाजिक कार्यकर्त्या शितल गमरे म्हणाल्या,' सध्या वाढत चाललेलं तापमान आणि लोकलमधील गर्दी दोन्ही कमी व्हायचं नाव घेत नाही. या लोकल गर्दीमुळे महिलांच्या डब्यात सीट किंवा धक्का लागण्यावरून दररोज भांडणे होतात. तर डब्यात शिरणाऱ्या गर्दुल्यांचा त्रास दिवस वाढू लागला आहे. या गर्दुल्यांची भीती महिलांमध्ये असते. या धकाधकीच्या प्रवासात बऱ्याच महिलांना ताणतणाव आहेच. त्यासोबत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांना मासिक पाळीचे त्रास देखील असतो. त्यामुळे महिलांना मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही समस्यांना सामोरं जावे लागत प्रवास करावा लागतो'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com