

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही
कल्याणजवळील टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडवली नदीकाठच्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याची हत्या झाली होती. कुठलाही पुरावा नाही. प्राथमिक तपासात मृताची ओळखही पटली नव्हती. या हत्येचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पण पोलिसांच्या श्वानामुळं या हत्येचा उलगडा झालाय. मृत व्यक्ती कोण होती, आरोपी कोण होता? ही हत्या का झाली? या हत्येला पार्श्वभूमी काय होती? हे सगळं तपासात समोर आलं. हत्येचं कारण आणि हत्या करणारा आरोपीबद्दल जी माहिती समोर आली, ती चक्रावणारी आणि तितकीच हादरवणारी होती.
खडवली नदी परिसरात (khadavali river) झालेल्या हत्येच्या घटनेची उकल करण्यात टिटवाला पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या श्वान पथकाच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लागला. तीन दिवसांपूर्वी खडवली नदीकाठच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. या प्रकरणी टिटवाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. टिटवाला पोलीस (Titwala Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, पोलीस अधिकारी नितीन मुदगुन, महेश कदम तसेच ठाणे एलसीबीचे अधिकारी भाऊसाहेब गायकवाड आणि जयवंत वारे यांच्या पथकाने तपास हाती घेतला.
तपासादरम्यान श्वान पथकाला घटनास्थळी फिरवण्यात आले. श्वानाने पोलिसांना थेट खडवली रेल्वे स्थानकापर्यंत मार्ग दाखवला. खडवली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही आधी तपासले. त्यानंतर पोलिसांनी खडवली ते मुंबईपर्यंत सुमारे ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासातून पोलिसांना आरोपीच्या संपर्कातील एक व्यक्ती सापडली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मृताची ओळख पटली. राजेश प्रभुळकर असे मृताचे नाव होते. तर आरोपी योगेश कदम असल्याचे समोर आले. (khadavali river murder accused arrested kalyan) दोघेही मित्र होते. ते एकत्र केटरर्सचे काम करत होते.
आरोपी योगेश कदम आणि राजेश प्रभुळकर हे खडवली नदीवर पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पार्टीही केली होती. त्याच्याकडील पैशांपैकी राजेशने ७०० रुपये चोरल्याचा संशय योगेशला आला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात योगेश कदम याने दगडाने ठेचून राजेशची हत्या केली आणि तेथून फरार झाला.
आरोपी होता वॉन्टेड
राजेश प्रभुळकर याची हत्या करून पसार झालेला आरोपी योगेश कदम हा मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या प्रकरणातही वॉन्टेड होता. योगेश कदम यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. टिटवाला पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.