

कल्याणमध्ये घटस्फोटाच्या वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला
सासरच्यांनी महिला आणि तिच्या भावावर चाकू अन् दगडाने हल्ला केला
या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले
या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या नवऱ्याला अटक केली
अन्य आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत
कौटुंबीक वादातून कल्याणमध्ये रक्तरंजित थराराची घटना समोर आली आहे. घटस्फोटाच्या वादातून संतप्त सासरच्यांकडून महिला आणि तिच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलिस ठाण्याबाहेरच चाकू आणि दगडाने दोघांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या नवऱ्याला अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील वालधुनी परिसरात कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना घडली. अशोकनगर भागात राहणाऱ्या रुक्सार आणि तिच्या भावावर नवरा तन्वीर खान, सासरा, दीर आणि नणंद यांनी मिळून हल्ला केल्याचा आरोप आहे. घटस्फोटासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांची बैठक झाली होती. मात्र या बैठकीत वाद चिघळला आणि रुक्सारला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली.
यानंतर रुक्सार आणि तिचा भाऊ अस्लम हे तक्रार दाखल करण्यासाठी महात्मा फुले पोलिस ठाण्याकडे गेले. मात्र पोलिस ठाण्याबाहेरच आरोपींनी त्यांच्यावर चाकू आणि दगडाने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनी स्वतःचा जीव वाचवत पोलिस ठाण्यात धाव घेतली. आरोपी त्यांचा पाठलाग करत पोलिस ठाण्याच्या आवारापर्यंत पोहचले होते. पण त्यांचे प्राण वाचले.
या हल्ल्यात रुक्सार आणि तिच्या भाऊ अस्लम हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान महात्मा फुले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी म्हणजे महिलेचा नवरा तन्वीर खानला अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली होती. सध्या सासरा आणि दीर फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.