.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
विरारमध्ये भाजपला मोठा राजकीय धक्का
साधना धुरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सोडली पक्षाची साथ
बहुजन विकास आघाडीत केला पक्षप्रवेश
पक्षातील निष्ठावंतांची गळचेपी होत असल्याचा आरोप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर विरारमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. विरारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. बड्या महिला नेत्याने पक्षाची साथ सोडत बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. भाजपच्या महिला सेल उपाध्यक्ष साधना धुरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिट्टी देत बहुजन विकास आघाडीत पक्षप्रवेश केला. निष्ठावंतांची भाजपमध्ये गळचेपी होत असल्याचा आरोप साधना धुरी यांनी केला.
वसई, नालासोपारा विधानसभा आमदारांकडून योग्य न्याय मिळाला नसल्यामुळे आणि पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप करत भाजप नेत्या साधना धुरी यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. रिल्स बनवल्याने कोणती कामे होत नसतात तर ती कामे प्रत्यक्षात करावी लागतात असा टोला लगावत साधना धुरी यांनी भाजपला रामराम ठोकला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील आणि बविआचे ज्येष्ठ नेते जितूभाई शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला.
साधना धुरी यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, 'माझे बंधू चंद्रशेखर धुरी यांनी गेल्या ४० वर्षांपासून भाजपचे काम तळागाळात रुजवले. पण ज्यांनी आयुष्य पक्षासाठी वेचले, अशा निष्ठावंतांना आता डावलले जात आहे. मला ज्या भागातून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते तिथे ८ ते ९ महिन्यांपूर्वी कॅनडाहून आलेल्या आणि कोणालाही परिचयाच्या नसलेल्या महिलेला तिकीट दिलं. भाजपच्या या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असून कार्यकर्त्यांनीच मला ही नाराजी व्यक्त करण्यासाठी सांगितले होते.'
'जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळेच आता आम्ही बहुजन विकास आघाडीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हितेंद्र ठाकूर यांनी ३५ वर्षे जनतेच्या हितासाठी दिली आहेत त्यामुळे ते खऱ्या अर्थाने संघर्षयोद्धा आहेत. भविष्यात बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर जे काम सांगतील ती कामे जनतेच्या हिताच्या विचाराने केली जातील.', असे साधना धुरी यांनी सांगितले. साधना धुरी यांच्या पक्षप्रवेशामुळे वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची ताकद वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.