

मासे खाताना घशात अडकलेला माशाचा काटा किती धोकादायक ठरू शकतो याची दोन गंभीर उदाहरणं नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात समोर आलीयेत. एका महिला आणि एका पुरुषाच्या घशात माशाचा काटा खोलवर अडकल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र डॉक्टरांनी वेळीच शस्त्रक्रिया करून दोघांनाही बरं केलंय.
डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत अशा प्रकारची अनेक प्रकरणं रुग्णालयात आली आहेत. माशाचा काटा घशात अडकला किंवा मानेतील मऊ ऊतींमध्ये शिरला तर गंभीर संसर्ग होऊ शकतो. यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते आणि वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
खोपोलीमध्ये राहणाऱ्या ५३ वर्षीय रोमा (नाव बदललेलं) या रात्रीच्या जेवणात मासे खाल्ले होते. त्यावेळी त्यांच्या घशात चुकून माशाचा काटा अडकला. त्यानंतर त्यांना घशात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि अन्न गिळताना त्रास होऊ लागला. काही दिवसांत हा त्रास वाढत गेला. आठवड्याभरात त्यांना श्वास घेण्यासही अडचण निर्माण झाली.
दुसरीकडे पनवेलमधील ६० वर्षीय शिक्षक नरेश (नाव बदललेलं) यांच्या बाबतीतही अशीच घटना घडली. दुपारच्या जेवणात मासे खात असताना त्यांच्या घशात माशाचा काटा अडकला. घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटू लागले आणि वेदना वाढल्या. काटा खाली जावा म्हणून त्यांनी प्रथम भाताचा गोळा गिळला आणि त्यानंतर केळंही खाल्लं. त्यानंतर त्यांनी रूग्णालयात धाव घेतली.
मेडिकव्हर रुग्णालयातील ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉ. राजेंद्र वाघेला यांनी सांगितलं की, महिला रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत आमच्याकडे दाखल झाल्या होत्या. सुरुवातीला व्हिडिओ लॅरिंगोस्कोपी तपासणीत घशाच्या उजव्या बाजूला सूज दिसत होती. मात्र काटा दिसत नव्हता. त्यामुळे पुढे सीईसीटी स्कॅन करण्यात आलं. या तपासणीत काटा घशातून बाहेर जाऊन मानेच्या आतील वरच्या भागात खोलवर अडकला असल्याचे स्पष्ट झाले. त्या ठिकाणी पू साचून फोड आला होता.
तपासणी सुरू असतानाच रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास वाढला. त्यांचा रक्तदाबही खूप वाढला होता. पुढील तपासणीत त्यांना हार्ट अटॅक आल्याचं समजलं. त्याचबरोबर त्यांचं हृदय व्यवस्थित काम करत नव्हतं. अँजिओग्राफीमध्ये हृदयाच्या अनेक रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचंही दिसलं.
या रुग्णावर उपचार करणं डॉक्टरांसाठी मोठं आव्हान होतं. प्रथम हृदयाची स्थिती स्थिर करण्यासाठी अँजिओप्लास्टी करून रक्त पातळ करणारी औषधं देणं आवश्यक होतं. मात्र अशी औषधं दिल्यास मानेवरील शस्त्रक्रियेदरम्यान जास्त रक्तस्राव होण्याचा धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी एकत्रित चर्चा करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
शस्त्रक्रियेदरम्यान मानेत सूज आणि संसर्ग असल्यामुळे काटा शोधणं कठीण होतं. त्यामुळे ऑपरेशनदरम्यान अल्ट्रासाऊंड मशीनची मदत घेण्यात आली. अल्ट्रासाऊंडच्या सहाय्याने काटा नेमका कुठे अडकला आहे हे शोधण्यात आलं. त्यानंतर मानेतील हायॉइड हाडाजवळील मऊ ऊतींमध्ये अडकलेला काटा सुरक्षितपणे काढण्यात आला. ही संपूर्ण शस्त्रक्रिया सुमारे एका तासात यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
कार्डिओलॉजिस्ट डॉ. तमीरुद्दीन दानावडे यांनी सांगितलं की, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर होती आणि त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आलं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अँजिओप्लास्टी करून हृदयातील दोन रक्तवाहिन्यांवर यशस्वी उपचार करण्यात आले. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या.
डॉ. दानावडे म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे होतं. शस्त्रक्रिया केली नसती तर रुग्णाची श्वासनलिका बंद होण्याची शक्यता होती. दुसरीकडे गंभीर हृदयाच्या समस्येमुळे जनरल अॅनेस्थेशिया देणंही धोकादायक होतं. मात्र विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी समन्वयाने काम केल्यामुळे उपचार यशस्वी झाले.
डॉक्टरांनी अशाच प्रकारे आलेल्या दुसऱ्या पुरुष रुग्णावरही वेळेत उपचार करून त्याचा जीव वाचवला.
डॉ. राजेंद्र वाघेला यांनी सांगितले की, या रुग्णाच्या प्राथमिक तपासणीत घशात सूज दिसत होती. मात्र काटा दिसत नव्हता. सीटी स्कॅनमध्ये काटा मानेच्या आतील भागात गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जनरल अॅनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशनदरम्यान अल्ट्रासाऊंडच्या मदतीने काट्याचं अचूक ठिकाण शोधण्यात आलं आणि तो सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
डॉ. वाघेला यांनी नागरिकांना सावधगिरीचा सल्ला देताना सांगितले की, मासे खाल्ल्यानंतर घशात बराच वेळ वेदना होत असतील, सूज आली असेल किंवा काहीतरी अडकल्यासारखं वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत उपचार न घेतल्यास गंभीर संसर्ग होऊ शकतो किंवा श्वासनलिका बंद होण्यासारखी जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी तातडीने ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉक्टरांनी घरगुती उपायांपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. केळे, ब्रेड, कोरडा भात खाणं, सोडा किंवा व्हिनेगर पिणं अशा उपायांनी समस्या सुटत नाही. उलट परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. तसंच बोट, चिमटा किंवा इतर कोणत्याही वस्तूने घशातील काटा काढण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे घशाला गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.