राज्यात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत असून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अवघ्या एका तासात झालेल्या जोरदार सरींमुळे शहरातील अनेक रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले तर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. एका तासाच्या पावसामुळे पुणे महापालिकेच्या कामाची देखील पोलखोल झाली. पुणे जिल्ह्यातील कुडजे गावात गारांचा पाऊस झाला असून अवेळी पावसाने शेतीचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यांत जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे गहू, कांदा आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. पन्हाळगड परिसरात जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारांचा मारा झाला.
जळगाव जिल्ह्यातील काही भागातही पावसाच्या सरी कोसळल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील मका, ज्वारी आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने त्यांच्यावर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. शेत पिकाचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.