

रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना एनडीएमध्ये येण्याची खुली ऑफर दिली
शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणात आमदार-खासदार जात असल्याचा दावा
एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेना नेते असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के देत आहेत. शिंदेंनी ठाकरेंचे ६ विश्वासू खासदार आणि एका आमदाराला फोडलं. या सर्वांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. एक- एक आमदार आणि खासदार ठाकरेंची साथ सोडत आहेत यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. 'आमदार-खासदार आमच्याकडे येताहेत, उद्धव ठाकरेंनीही आमच्याकडे यावे.', असे विधान आठवले यांनी केलं.
कोल्हापूरमध्ये रामदास आठवले यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये आठवले यांनी राज्यातील वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत रामदास आठवले म्हणाले की, 'उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आंदोलन करणं हेच काम राहिलं आहे. खासदार फुटले आहेत आता आमदार देखील फुटतील. अयोध्या मंदिरात घोटाळा झाला आहे रामाशी बेईमानी करणं योग्य नाही. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राम मंदिरात झालेला घोटाळा एनडीए खपवून घेणार नाही.'
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खरे नेते असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन रामाचं दर्शन घ्यावं. उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार-खासदार ठेवण्याची कुवत नाही. या सगळ्या फोडाफोडीला अमित शाह यांना जबाबदार धरू नये. 2029 साली देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. हे ऑपरेशन टायगर आहे, ऑपरेशन देवेंद्र नाही. संजय राऊत यांचे काही तोंड आम्ही बंद करू शकत नाही. एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनेचे खरे नेते आहेत अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे जात आहेत.'
रामदास आठवले यांनी यावेळी राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी यांचे 8 खासदार आमच्याकडे येतात का हे पाहणार आहे. इतके आमदार-खासदार आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील आमच्याकडे यावेत. राज ठाकरे यांना आमदार निवडून आणता येत नाही. त्यामुळे ते आमदार फुटतात असं म्हणतात. पण ते आमदार आमच्याकडे येतात. जे येतात त्यांना आम्ही घेतो. राज ठाकरे असं बोलतात म्हणून त्यांचे आमदार निवडून येत नाहीत. राज ठाकरे हे भूमिका बदलणारे नेते आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.