

वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत असलेल्या ‘कॅनाईन डिस्टेंपर व्हायरस’ (सीडीव्ही) संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने भटकी तसंच पाळीव कुत्री यांच्या लसीकरण आणि नसबंदी मोहिमेला वेग देण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवून विविध प्रतिबंधात्मक उपाय प्रभावीपणे अमलात आणले जात आहेत.
कान्हा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा सलग मृत्यू झाल्याने वन्यजीव क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. तपासानंतर टी-१४१ वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मृत्यू शिकारीमुळे नसून कॅनाईन डिस्टेंपर व्हायरस (सीडीव्ही) संसर्गामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. अभयारण्यालगतच्या गावांमध्ये फिरणाऱ्या कुत्र्यांकडून हा विषाणू वाघांपर्यंत पोहोचल्याचा दावा वन विभागाने केलाय.
कॅनाईन डिस्टेंपर हा कुत्रे आणि विविध वन्य मांसाहारी प्राण्यांमध्ये पसरणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग मानला जातो. मॉर्बिलिव्हायरस गटातील हा व्हायरस कुत्रे, कोल्हे, लांडगे, वाघ, सिंह तसंच रानकुत्रे यांना बाधित करतो. इन्फेक्टेड प्राण्यांच्या श्वसनातून बाहेर पडणारे थेंब, लाळ, मूत्र, मल किंवा डोळ्यांतील स्त्राव यांच्या संपर्कामुळे या आजाराचा प्रसार होतो.
वन्यजीव तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लसीकरण न झालेली किंवा अपुरं लसीकरण झालेली भटकी कुत्री वन्य प्राण्यांमध्ये संसर्ग पसरवण्याचं प्रमुख कारण ठरतंय. ताप येणं, खोकला, अतिसार, शरीरात अशक्तपणा जाणवणं, आकडी येणं तसंच चालताना तोल जाणं ही या आजाराची मुख्य लक्षणं मानली जातात. संसर्ग गंभीर स्वरूपात गेल्यास मृत्यूचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढतो.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि वनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या देखरेखीखाली बफर आणि कोर क्षेत्रालगतच्या गावांमध्ये पाळीव आणि भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीजसह कॅनाईन डिस्टेंपर प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलीये.
वन विभागाच्या माहितीनुसार, परिसरातील बहुतांश गावांमध्ये ही मोहीम जवळपास पूर्ण झाली असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जातोय. वन्यजीवांचे संरक्षण तसंच संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचं सांगितलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.