पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलची बचत करा अन् सीएनजी जपून वापरा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ दिवसात २ वेळा केल्यामुळे देशात संभ्रमाचे वातावरण तयार झाले. अनेकांनी पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी रांगा लावल्याचे समोर आले. भारताकडे पुरेसा इंधनाचा साठा आहे का? असा सवाल अनेकांच्या मनात घोंगावतोय. सोशल मीडियावर अनेकांनी यावर सरकारला प्रश्नही विचारला. यावर आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात मुबलक इंधन साठा असल्याची माहिती दिली आहे.
घाबरू नका, भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा आहे, असे ते म्हणाले. दिल्ली येथील CII वार्षिक बिझनेस समिट २०२६ मध्ये बोलताना त्यांनी देशातील इंधन साठ्यावर माहिती दिली. भारताकडे कच्च्या तेलाचा (Crude Oil) आणि LNG चा पुढील ६० दिवसांचा साठा शिल्लक आहे. तर पुढील ४५ दिवसांचा गॅस (LPG) साठा आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करण्याबाबत जे आवाहन केलेय, पण त्याचा अर्थ नीट समजून घ्या. त्यांच्या बोलण्याचा कोणताही चुकीचा किंवा 'विचित्र अर्थ' काढू नका, असे आवाहन पुरी यांनी केले.
देशात इंधनाचा पुरेसा साठा असून पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नाही, त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही. फक्त इंधनाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी अनेक पंपावर झुंबड उडाली आहे. पण देशात मुबलक तेलसाठा असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण पुढील परिस्थिती पाहता इंधनाचा वापर जपून करावा.
मागील ७५ दिवसांत आमच्यासमोर अनेक आव्हाने होती, पण आम्ही डगमगलो नाही. उलट, त्या संकटाचे रूपांतर आम्ही संधीमध्ये केले. जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारताने ऊर्जा क्षेत्रात (Energy Sector) अतिशय वेगाने आणि आत्मविश्वासाने काम केले आहे. लोकांचा असा समज आहे की भारत फक्त दुसऱ्या देशांकडून तेल किंवा ऊर्जा विकत घेतो (आयात करतो). पण हे पूर्ण सत्य नाही. कच्चे तेल शुद्ध करण्याच्या बाबतीत (Refining) भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. शुद्ध केलेले इंधन किंवा ऊर्जा उत्पादने बाहेरच्या देशांना विकण्यात (निर्यात करण्यात) भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे, असे मंत्री हरदीप पुरी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.