विश्वभूषण लिमये, साम टीव्ही
सोलापूर: राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू आहे. अनेक विद्यार्थी हे अडचणींवर मात करून पेपर देत असतात. अशातच सोलापूरमधील एका विद्यार्थिनीसोबत अत्यंत वाईट अशी घटना घडली आहे. तिच्या वडिलांच्या निधनाचे दु:ख सहन करत तिने दहावीचा पेपर दिला. धनश्री भिकाजी पवार असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. धनश्रीचे वडील भिकाजी पवार यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. परिवारात शोककळा पसरली. एकीकडे दुःखाचा डोंगर असताना धनश्रीचा दहावीचा पहिला पेपर होता. मुलीचा पेपर बुडू नये आणि वडिलांचे तिच्याबाबतचे स्वप्न अपूर्ण राहू नये, या भावनेतून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तात्काळ पुढाकार घेतला.
ते स्वतः धनश्रीच्या घरी गेले. नातेवाईकांशी चर्चा करून अंत्यविधी दोन तास पुढे ढकलण्याची विनंती केली आणि धनश्रीला परीक्षेसाठी तयार केले. मुख्याध्यापक माने यांनीच स्वतः तिला परीक्षा केंद्रावर नेले. पेपरला पूर्णवेळ बसणे शक्य नसल्याने परिस्थितीची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना देण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी जगताप यांनी स्वतः केंद्रावर येऊन विद्यार्थिनीला धीर दिला. धनश्रीने दीड तास पेपर लिहिल्यानंतर मुख्याध्यापक माने यांनी तिला सेवक संतोष लोंढे यांच्या गाडीतून अंत्यविधीसाठी घरी आणले.
वडिलांच्या निधनाच्या दुःखातही शिक्षणासाठी घेतलेला हा निर्णय आणि शिक्षकांनी दाखवलेली संवेदनशीलता यामुळे उपस्थित नातेवाईक तसेच शाळा प्रशासनाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. धनश्रीच्या धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. धनश्री आपल्या वडिलांचे स्वप्न नक्की पूर्ण करेल असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.