पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट वीज मीटरबाबत विविध प्रकारच्या अफवा पसरविल्या जात असून, त्यामध्ये "स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा बसविण्यात आला आहे", "ग्राहकांच्या घरांवर नजर ठेवली जाते", "घरातील हालचालींचे चित्रीकरण केले जाते" अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांचाही समावेश आहे. या अफवांमुळे काही ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी या सर्व दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
स्मार्ट वीज मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग यंत्रणा, ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली किंवा ग्राहकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे कोणतेही उपकरण यात बसविण्यात आलेले नाही. स्मार्ट मीटर हे केवळ वीज वापराची अचूक नोंद करण्यासाठी आणि ती माहिती सुरक्षित डिजिटल प्रणालीद्वारे महावितरणच्या नियंत्रण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित करण्यात आलेले आधुनिक उपकरण आहे.
सोशल मीडियावर स्मार्ट मीटरवरील एका छोट्या पारदर्शक भागाला कॅमेरा असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात तो इन्फ्रारेड (Infrared - IR) कम्युनिकेशन पोर्ट असून त्याचा उपयोग अधिकृत तांत्रिक कर्मचारी मीटरची तपासणी, चाचणी किंवा डेटा वाचण्यासाठी करतात. हा केवळ डेटा संवादासाठी वापरला जाणारा पोर्ट असून त्यामध्ये कॅमेऱ्यासारखे लेन्स, इमेज सेन्सर किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगची कोणतीही क्षमता नसते. त्यामुळे त्याद्वारे फोटो काढणे, व्हिडिओ चित्रीकरण करणे किंवा ध्वनिमुद्रण करणे अशक्य आहे.
स्मार्ट मीटर कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांच्या घरातील व्यक्ती, हालचाली किंवा दैनंदिन व्यवहारांचे निरीक्षण करत नाही. मीटरमध्ये फक्त वीज वापराशी संबंधित तांत्रिक माहितीचीच नोंद होते. ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि वीज वापराचा डेटा सुरक्षित तांत्रिक प्रणालीद्वारे संरक्षित केला जात असून, त्याची गोपनीयता राखण्यासाठी आवश्यक सायबर सुरक्षा उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत.
स्मार्ट मीटर ही आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली असून तिचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांना अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हे आहे. या मीटरमुळे वीज वापराची स्वयंचलित नोंद होते, त्यामुळे मीटर रीडिंगमधील मानवी त्रुटी कमी होतात. अचूक बिलिंग, रिअल-टाईम वीज वापराची माहिती, जलद तक्रार निवारण आणि अधिक कार्यक्षम वीज व्यवस्थापन यांसारख्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध होतात. ग्राहकांना महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा डिजिटल सेवांच्या माध्यमातून स्वतःचा वीज वापर, बिलाचा तपशील, वापराचा इतिहास आणि इतर माहिती सहज पाहता येते. त्यामुळे अनावश्यक वीज वापर ओळखून त्यावर नियंत्रण ठेवणे आणि ऊर्जा बचत करणेही अधिक सोपे होते.
स्मार्ट मीटरबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणने नागपूर परिमंडळात ग्राहक मेळावे, जनजागृती अभियान, माहितीपत्रके आणि प्रत्यक्ष संवाद कार्यक्रम आयोजित केले आहेत. या उपक्रमांमध्ये तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरची कार्यपद्धती समजावून सांगत ग्राहकांच्या शंकांचे समाधान केले असून, या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, "स्मार्ट वीज मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नाही. हे मीटर केवळ अचूक व सुरक्षित वीज मोजणी, पारदर्शक बिलिंग आणि आधुनिक ग्राहक सेवेसाठी विकसित करण्यात आलेले आहेत. अफवांवर नाही, तर अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा," असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.