सांगलीच्या पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे धक्कादायक घटना
एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट
मानसिक तणावातून तरुणीची आत्महत्या
आरोपी प्रियकराला बेड्या
सांगलीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीने गुरुवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.अंकुर बबन सुतार असे आरोपीचे नाव असून ऋतुजा हलस्कर असे मृत तरुणीचे नाव आहे.या घटनेमुळे सावंतपूरसह संपूर्ण पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,ऋतुजा हलस्कर आणि अंकुर सुतार हे एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये ये-जा होती. या ओळखीचा फायदा घेत अंकुर ऋतुजावर एकतर्फी प्रेम करू लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ऋतुजा ही पलूस येथील शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये शिकत होती. तर अंकुर कोल्हापूर येथील एका ज्वेलरी दुकानात काम करत असल्याची माहिती आहे. ऋतुजाने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नसल्याने अंकुरकडून १५ दिवसांपासून तिला वारंवार फोन आणि मेसेज केले जात असल्याचा आरोप आहे. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर,’ अशा आशयाचे मेसेज पाठवून तिच्यावर प्रेमसंबंधासाठी दबाव आणला जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सततच्या फोन, संदेश आणि मानसिक त्रासाला कंटाळून ऋतुजाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, ऋतुजाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून अंकुर बबन सुतार याच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान फोन कॉल, मेसेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.