

परभणीत पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
परभणी जिंतूर शेतात सापडला मृतदेह
पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ
विशाल शिंदे, साम टीव्ही
गडचिरोलीतून तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची घटना ताजी असताना परभणीतूनही खळबळजनक घटना समोर आली आहे. परभणीच्या जिंतूर ते परभणी महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करताना पोलीस जमादाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस जमादाराच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर राणा शिंदे असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. परभणी पोलीस मुख्यालयातील बँड पथकात जमादार म्हणून कार्यरत होते. ४० वर्षीय गंगाधर राणा शिंदे शनिवारी मध्यरात्रीनंतर ते जिंतूरहून परभणीकडे दुचाकीने निघाले होते. पहाटे अंदाजे २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास ते माक पाटी परिसरातून जात असताना ही घटना घडल्याचा अंदाज आहे.
गंगाधर राणा शिंदे यांचा सकाळी एका शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी त्यांच्या दुचाकीचाही शोध लागला असून अज्ञात वाहनाने धडक दिल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मृत्यू नेमका अपघाती आहे की अन्य काही कारणामुळे झाला,याबाबत अधिक तपास सुरू आहे. गंगाधर यांचा शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकी माहिती स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे पोलीस दलात तसेच स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली शहरातील धानोरा रोडवरील शिवाजी कॉलेजसमोरील मोकळ्या मैदानात २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. हरबचनसिंग खन्ना सिंग पटवा असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गडचिरोलीच्या गोकुळ नगर भागातील रहिवासी होता. मैदानात व्यायामासाठी आलेल्या मुलांना हा तरुणाचा मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने कुटुंबीय आणि पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवलाय. फॉरेन्सिक पथकाकडूनही तपास सुरू आहे. तरुणाच्या नाक, तोंड आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याचे आढळले असून मृत्यू संशयास्पद मानला जात आहे. मृताच्या कुटुंबीयांनी हा खून असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.