घरातील सोने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून नाशिकचे माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्या कुटुंबियांची तब्बल 200 तोळे सोन्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित सराफ व्यावसायिक योगेश दाभाडे याच्याविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भामट्याने मूर्तडक कुटुंबाला तब्बल सव्वा ते दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याने नाशिकच्या राजकीय आणि सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सराफ योगेश दाभाडे याने माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्याने घरातील जुने सोने दुप्पट करून देण्याचे आमिष मूर्तडक यांच्या पत्नी, मुलगी आणि सुनेला दाखवले. सराफाच्या आमिषाला बळी पडून मूर्तडक यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याकडे 200 तोळे सोने सुपूर्द केले.
सोने घेऊन काही उलटल्यानंतर मूर्तडक कुटुंबीयांनी दाभाडे याच्याकडे सोन्याची मागणी केली. मात्र, त्याने प्रत्येक वेळी टाळटाळ करण्यास सुरुवात केली. वारंवार मागणी करूनही सोने परत मिळत नसल्याने आणि सराफाच्या बदललेल्या भूमिकेमुळे आपली फसवणूक झाल्याचे मूर्तडक कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने हा प्रकार माजी महापौर अशोक मूर्तडक यांना सांगितला.
आपल्या कुटुंबाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी थेट पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मुर्तडक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सराफ व्यावसायिक योगेश दाभाडे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बाजारमूल्यानुसार या २०० तोळे सोन्याची किंमत सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपयांच्या घरात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयित सराफाचा शोध घेतला जात आहे. एका प्रतिष्ठित राजकीय नेत्याच्या कुटुंबाची अशा प्रकारे फसवणूक झाल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.