

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट
कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना अटक
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्याला अटक
अमृत पाटील आणि त्यांच्या पत्नीला मिळाला होता आदर्श शिक्षक पुरस्कार
एमपीएससी औषध निरिक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एमपीएससी पेपर फुटीचे धागेदोरे नंदुरबार जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील आणि ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांच्यासोबतच ५ जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली. ऋतुजा पाटील आणि तिचा प्रियकर दोघेही फरार होते. अखेर पोलिसांनी ऋतुजाचा प्रियकर गौरव पाटीलला देखील अटक केली. अमृत पाटील आणि गौरव पाटील यांची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आलं असून त्यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. सहाही आरोपींना न्यायालयाने २ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी असलेले ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि तिची आई नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. पाटील दांपत्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता .
आरोपी अमृत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. अमृत पाटील हे मुख्याध्यापक म्हणून तर त्यांच्या पत्नी उज्वला पाटील शिक्षक म्हणून परिवर्धा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. अमृत पाटील यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर शाळेतील त्यांच्या सहकारी शिक्षकांनी भावना व्यक्त केली. अमृत पाटील यांच्या स्वभावाबद्दल त्याच्या सहकारी शिक्षकांनी माहिती दिली.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आणखी एक नवा चेहरा उघड झाला आहे. कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील आणि ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांच्यात पेपरफुटी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या मयूर आबाजी ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मयूर ठाकरे हे नंदुरबारच्या एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पेपर फुटीप्रकरणात मयूर ठाकरे यांनी संचालक प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांच्यात या पेपर फोडण्यासंदर्भात भेट घडवून आणली होती. या संपूर्ण प्रकारात आता मध्यस्थी करणारा शिक्षक मयूर ठाकरे कायद्याच्या कचाट्यात सापडले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.