

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांच्या ऊरळी कांचन पोलिसांनी अटक केलीये. पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर बाळू लोंढे याला पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीच्या ताब्यात देण्यात आलंय.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू प्यायल्याने काही जणांचा मृत्यू झाला होता. २६ ते २८ मेदरम्यान दापोडी आणि हडपसर परिसरात हा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडून सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात १० ते १२ आरोपींना अटक झाली असून हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीची पथकं काम करतायत.
तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता. सीआयडीसह पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, मे महिन्यापासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता.
दरम्यान बाळू लोंढे हा लोणी काळभोर आणि ऊरळी कांचन परिसरात असल्याची माहिती ऊरळी कांचन पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून गुप्तपणे त्याचा शोध सुरू केला. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं.
या गुन्ह्यात आर्यन संजीव धोत्रे (२४) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (२९) यांना मंगळवारी (२५) अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बाळू लोंढेची या प्रकरणातील भूमिका, दारूचा पुरवठा करणारे लोक, त्याच्याशी संबंधित व्यक्ती आणि संपूर्ण रॅकेटची साखळी याबाबत त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील इतर आरोपी आणि संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे.
पोलिसांपासून वाचण्यासाठी बाळू लोंढेने फरार असताना आपला पेहराव आणि लूकही बदलला होता. नेहमी दाढी-मिशा वाढवून आणि कपाळावर टिळा लावून वावरणारा बाळू आता दाढी-मिशा काढून मळकट कपड्यांमध्ये फिरत असल्याचे तपासात समोर आले आहे. ओळख लपवून तो पोलिसांच्या नजरेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ऊरळी कांचन पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत अखेर त्याला अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.