विजय पाटील, साम टीव्ही
सांगली: गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सिअस तापमानामुळे होरपळून निघणाऱ्या सांगली जिल्ह्याला आज निसर्गाच्या दोन टोकाच्या रूपांचा अनुभव आला. मिरज शहरासह परिसराला सायंकाळच्या सुमारास वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या या संकटामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे
सांगली जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्या पार गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मिरज शहरात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की काही वेळातच रस्त्यांवर पाणी साचले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या पडल्याने आणि तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी, मिरज तालुक्यातील अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत अंधाराचे साम्राज्य होते.
मिरज शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे द्राक्ष बागा, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आधीच कडाक्याच्या उन्हाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता या अवकाळी पावसामुळे मोठे संकट उभे राहिले आहे.
अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे सायंकाळच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची आणि वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.