Marathwada Yatra: १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांचे देवस्थान, यादवकालीन श्री वैद्यनाथ मंदिर; वर्षात होतात ९ मोठे उत्सव

Vaijnath Temple: १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बीडचे वैद्यनाथ मंदिरामध्ये वर्षात ९ मोठे उत्सव भरतात. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
Marathwada Yatra: १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांचे देवस्थान, यादवकालीन श्री वैद्यनाथ मंदिर; वर्षात होतात ९ मोठे उत्सव
Vaijnath TempleSaam Tv
Published On: 

लेखक: लक्ष्मण वाकडे

लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले परळी वैजनाथ (जि. बीड) येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे. येथील भव्य अशा पुरातन मंदिरात महाशिवरात्री यात्रा व श्रावणमास या पर्वकाळात दोन मोठे उत्सव घेण्यात येतात. याशिवाय अधिक मासात भाविकांची मोठी गर्दी असते. नियमितपणे देश-विदेशातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे किंवा पाचव्या स्थानावर श्री वैद्यनाथ किंवा वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे. श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या वास्तव्याने आणि ब्रह्मदेव, प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली परळी ही शिव, देव व तीर्थभूमी आहे. आख्यायिकेप्रमाणे पुराणकाळी समुद्र मंथनावेळी धन्वंतरी वैद्यराज व अमृत ही रत्ने निघाली. अमृत पिण्यासाठी राक्षस धावले तेव्हा भगवान श्री विष्णूंनी अमृतासह धन्वंतरीला शंकराच्या पिंडीत गुप्त केले. त्यामुळे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला ‘अमृतेश्वर’ किंवा ‘वैद्यनाथ’ हे नाव मिळाले. इंद्रदेवाच्या दरबारातील ‘रत्न’ म्हणून प्रभू वैद्यनाथाची ओळख होती, अशी कथा आहे. भगवान श्री विष्णूंनी देवांना अमृत विजय मिळवून दिल्यामुळे परळीला ‘वैजयंतीक्षेत्र’ म्हणून ओळखले जात असे.

Marathwada Yatra: १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांचे देवस्थान, यादवकालीन श्री वैद्यनाथ मंदिर; वर्षात होतात ९ मोठे उत्सव
Beed News: आमचं लग्न होईना, पाऊस पडेना...; शेतीच्या बांधावरून तरुण शेतकऱ्याचा कृषीमंत्र्यांना फोन

पौराणिक महत्त्व -

पुराणकाळी मोठ्या तपश्चर्येनंतर जन्मलेल्या व अल्पायुषी असलेल्या मार्कंडेयाने आपल्या आई-वडिलांना होणारे दुःख नाहीसे करण्यासाठी परळीक्षेत्री शिवोपासना केली. या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या भगवान शिवशंकराच्या वरप्रसादाने मार्कंडेयाचा मृत्यू टळला. त्याला सोळा कल्पाचे आयुष्य मिळाले. त्यामुळे यमधर्माला विन्मुख होऊन परत जावे लागले. मार्कंडेयाने देवाचे ऋण व्यक्त करण्यासाठी दोन्ही हातांनी शिवपिंडीला कवटाळले. तेव्हापासून दोन्ही हात कवटाळून प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीचे दर्शन घेण्याची प्रथा येथे पडली. दरम्यान, पुराणातील बिल्वियबाळ व सतीसावित्रीची कथाही परळीक्षेत्री घडल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात आहे. शहराच्या पश्चिमेला ‘नारायणगड’ वा मेरू पर्वताच्या कुशीत उतरणीला श्री वैजनाथ प्राचीन मंदिर आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींकडून जीर्णोद्धार -

श्री वैद्यनाथ मंदिर यादवकालीन आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शालिवाहन शके १७०६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार केला. याची नोंद मंदिराच्या लाकडी सभामंडपातील तीन नंदींसमोरच्या मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर शिलालेखात आहे.

Marathwada Yatra: १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांचे देवस्थान, यादवकालीन श्री वैद्यनाथ मंदिर; वर्षात होतात ९ मोठे उत्सव
Marathwada Farmer: संकट काही संपेना! आधी अतिवृष्टीने झोडपलं, आता मदत मिळायला अडथळा, e-KYC मुळे ११ लाख शेतकऱ्यांची दिवाळी कडू

परिसरात विविध देवालये -

श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासह बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत. मंदिराच्या दक्षिण घाटावर उंच शिखर असलेले श्री ब्रह्मेश्वर शिवमंदिर आहे. श्री ब्रह्मदेवाने येथे शिवपिंड स्थापन केल्याची आख्यायिका सांगितली जाते. पूर्वेकडील महाद्वारासमोर श्री नृसिंह, श्री रुद्राणीदेवी, श्रीधरस्वामी यांची छोटी मंदिरे आहेत.

नंदीच्या सभामंडपात श्री वीरभद्राची पितळी धातूची भव्य मूर्ती आहे. श्री गायत्रीदेवीचीही मूर्ती येथे आहे. मुख्य गाभाऱ्याच्या दक्षिण दरवाजातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला भिंतीवर श्री भवानीमातेची मूर्ती आहे. मंदिराच्या पश्चिमेला श्री नारद व वक्रेश्वराची मंदिरे आहेत. गोमुखाजवळ श्री कुबेरेश्वर शिवमंदिर आहे. येथून मंदिराच्या भिंतीच्या दगडांत गारगोटी असून तिची ‘गुप्तगंगा’ म्हणून भाविकांत ओळख आहे. श्री रामेश्वर मंदिरानजीक नागेश्वराचे मंदिर आहे. अशी विविध मंदिरे येथे आहेत.

श्रीक्षेत्र काशीपेक्षाही एक जवभर पुण्य परळीत अधिक आहे. त्यामुळे परळीला ‘जवा’ किंवा ‘जगावेगळी काशी’ असे संबोधले जाते. मंदिर आवारात उत्तरेकडील प्रवेशद्वारालगत भव्य दगडी दीपमाळ आहे. दिवाळी पाडवा व गुढीपाडव्याच्या दिवशी या दीपमाळीवर दिवे लावण्याची प्रथा आहे. या दीपमाळीखाली श्री वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे.

श्री वैद्यनाथ मंदिरात श्री नारायण, श्री हरिहर, अमृतकुपी, मार्कंडेय तीर्थ आहे. श्री वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वघाटालगत संत श्री गुरुलिंग स्वामी, उत्तरघाटावर संत श्री चक्रेश्वर, आद्य शंकराचार्यांचे मंदिर आहे. मंदिर परिसरात बाजार प्रांगणात श्री दक्षिणमुखी गणेश मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे. उत्तरघाटाच्या पायऱ्यांलगत श्री शनी मंदिर आहे. श्री शनी मंदिराजवळच श्री शमना देवीचे मंदिर आहे.

Marathwada Yatra: १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांचे देवस्थान, यादवकालीन श्री वैद्यनाथ मंदिर; वर्षात होतात ९ मोठे उत्सव
Marathwada Yatra: पौष, आषाढ अन् अश्विन; तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात वर्षभरात ३ यात्रा, काय आहे महत्व?

अशी आहे मंदिराची रचना -

श्री वैद्यनाथ मंदिराचे बांधकाम हेमाडपंती असून ते घडीव, चिरेबंदी व भव्य आहे. वैद्यनाथाचे मंदिर उंचावर आहे. मंदिराच्या पूर्व व उत्तरेला असलेल्या ऐसपैस पायऱ्या, प्रशस्त आवार व रमणीय परिसर ही येथील वैशिष्ट्ये आहेत. मंदिराला भव्य, उंच, दगडी शिखर आहे. मुख्य मंदिराला पाच प्रवेशद्वार आहेत. पूर्वेकडील महाद्वार भव्य, चिरेबंदी आहे.

या महाद्वाराच्या आत विस्तीर्ण, उंच व प्रशस्त सागवानी लाकडाचा सभामंडप आहे. या सभामंडपात चबुतऱ्यावर चार दगडी कोरीव खांबांवर मंडप असून मंडपात नंदीच्या तीन मूर्ती आहेत. त्यापुढे श्री गणेशाची मूर्ती आहे.

परळीक्षेत्री शिवाचा निवास हा सहकुटुंब आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाची काळ्या पाषाण शिळेची सतेज भव्य, प्रसन्न स्वयंभू शालिग्राम शिवपिंड आहे. या गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मराठमोळ्या वेशात माता पार्वती. पुढच्या कासव गाभाऱ्यात श्री गणेश व इतर देव-देवतांच्या मूर्ती आहेत.

Marathwada Yatra: १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांचे देवस्थान, यादवकालीन श्री वैद्यनाथ मंदिर; वर्षात होतात ९ मोठे उत्सव
Marathwada Yatra: पंढरपूरनंतरची दुसरी मोठी यात्रा, पैठणनगरीत फुलतो भक्तीचा मळा

महत्त्वाचे मोठे उत्सव -

चैत्रशुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा), श्रावणमास उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, दसरा उत्सव, दीपोत्सव, दिवाळी पाडवा, वैकुंठ चतुर्दशी, मकरसंक्रांत व महाशिवरात्र उत्सव हे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील महत्त्वाचे धार्मिक सण, उत्सव आहेत.

गुढीपाडव्याला ‘श्रीं’ची अलंकार पूजा होते. मंदिर शिखरावरील निशाण याच दिवशी विधिवत पूजा करून बदलतात. अक्षय्य तृतीयेला अलंकारपूजा असते. श्रावणामध्ये मंदिर भाविकांनी गजबजलेले असते. श्रावण सोमवारी गर्दी अधिक असते. देवदर्शनानंतर मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. अनेक भाविक गोदावरीचे पाणी आणून जलाभिषेक करतात.

विजयादशमीला ‘श्रीं’ची अलंकार पूजा होते. सायंकाळी पालखी मिरवणूक निघते. रात्री श्री कालरात्रीदेवीची पालखी मंदिरात येते. दोन्ही पालख्यांची मुख्य मंदिराला प्रदक्षिणा होते. दिवाळी पाडव्याला ‘श्रीं’ची अलंकार पूजा मांडली जाते. वैकुंठ चतुर्दशीला धार्मिक कार्यक्रम होतो.

मकर संक्रांतीला भाविक शेरणी प्रसाद वाटतात, ‘श्रीं’ची अलंकार पूजा होते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात पाच दिवस धार्मिक उत्सव असतो. सायंकाळी महापूजा होते. दुसऱ्या दिवशी भजन, पूजन, प्रसाद तर तिसऱ्या दिवशी श्री वैद्यनाथाची पालखी मिरवणूक निघते. त्यानंतर पुढील दिवसांत बिदागी, प्रसाद असे कार्यक्रम होतात.

अधिक महिन्यात महिनाभर येथे भाविकांची गर्दी असते. परगावच्या भाविकांसाठी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे श्री वैद्यनाथ मंदिरात १९८१ पासून श्री सदाशिव सेवा नित्य अन्नछत्र चालवले जाते.

पहाटे असते महापूजा -

पहाटे पाचला पुजारी श्री वैद्यनाथाची महापूजा करतात. देवस्थान ट्रस्टच्या वतीने नेमलेल्या पुजाऱ्याच्या हस्ते अभिषेक होतो. त्यानंतर भाविकांसाठी अभिषेक व दर्शनास सुरुवात होते. दुपारी दोन ते तीनदरम्यान पुजारी भस्मपूजा करतात. रात्री दहाला पूजा, शेजारती होते. दर सोमवारी रात्री मुख्य मंडपात देवाचा छबिना असतो. भजन, पूजन, पालखी कार्यक्रम होतात.

कसे जायचे?

परळीत येण्यासाठी मुंबई, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, अमरावती, नांदेड, पंढरपूर, हैदराबाद येथून थेट रेल्वेसेवा उपलब्ध आहे. शिवाय राज्यातील महत्त्वाच्या शहरांपासून थेट बससेवाही उपलब्ध आहे.

Marathwada Yatra: १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांचे देवस्थान, यादवकालीन श्री वैद्यनाथ मंदिर; वर्षात होतात ९ मोठे उत्सव
Marathwada Yatra: ३ वर्षांतून एकच यात्रा, पण असते तब्बल ३३ दिवसांची! बीडच्या पुरुषोत्तमपुरीत देशातील अनोखा यात्रोत्सव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.