

महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी माता. ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष होताच शरीर रोमांचित होते, मनात भक्तिभाव दाटून येतो आणि नकळत मनोमन भक्त नतमस्तक होतो, अशी तुळजापूरची (जि. धाराशिव) तुळजाभवानी माता. बालाघाट डोंगर रांगांवर वसलेले आई तुळजाभवानी मातेचे मंदिर म्हणजे राज्यातील पहिले आणि पूर्ण शक्तिपीठ आहे. वर्षातून इथे तीनवेळा यात्रा भरत असते.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर धाराशिव जिल्हा वसलाय. तुळजापूर हे धाराशिवपासून अवघ्या २२, तर सोलापूरवरून ३९ किलोमीटर अंतरावर आहे. पूर्ण शक्तिपीठ कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर असलेले तीर्थक्षेत्र इथे आहे. तुळजापूरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. तुळजापूरमध्ये बालाघाटाच्या डोंगरावर तुळजाभवानी मातेचे भव्य पुरातन मंदिर आहे. मातेची मूर्ती ही चल मूर्ती आहे. तसेच, देवीची मूर्ती ही गंडकी पाषाणाची आहे.
मंदिरात कुलधर्म करण्यासाठी राज्यासह देशभरातून भाविक परंपरेने येतात. तसेच या शहराला प्राचीन इतिहासदेखील आहे. अनेक राजवटीत तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे अस्तित्व पिढ्यानपिढ्या कायम राहिलेले आहे. मातेचे मंदिर हेमाडपंती आहे. बीडच्या ठिगळे घराण्याने देवीच्या कळसासाठी सोने दिल्याचे आजही सांगण्यात येते. तुळजाभवानी मातेच्या वर्षातून तीन यात्रा प्रामुख्याने होतात. चैत्र पौर्णिमेला चैत्री यात्रा होते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा या कालावधीत तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव पार पडतो. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रात दुर्गाष्टमीस पूर्णाहुती सोहळा होमकुंडात होतो.
अश्विन शुद्ध नवमीस तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापन होते. तर, अश्विन शुद्ध दशमीला पहाटे तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन पहाटे पार पडते. बुरानगर येथील भगत कुटुंबीयांकडून आलेल्या पालखीतून तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन होते. सध्याच्या भगत कुटुंबीयांच्या माहितीनुसार तिसावी पिढी तुळजाभवानी मातेची पालखी घेऊन तुळजापुरात येते. तसेच, नगर येथील गणेश पलंगे हे कुटुंबीयांसह हुडकाबाईचा पलंग घेऊन येतात. तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन झाल्यानंतर अश्विन शुद्ध दशमी ते अश्विन शुद्ध पौर्णिमा या कालावधीत तुळजाभवानी माता नगर येथून आलेल्या पलंगावर श्रमनिद्रा (विश्रांती) घेते. तसेच, कर्जत येथील कापरेवाडी येथील अंबादास क्षीरसागर, सागर क्षीरसागर या कुटुंबीयांकडून मायमोरताब, तर अर्जुन सुतार यांच्याकडे दिवटी-बुधली सीमोल्लंघनावेळी आणण्याचा मान आहे.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरास भाविकांच्या पूजा विधीतून, देणगीतून मोठे उत्पन्न मिळते. व्यावसायिकांचे व्यवसाय, तसेच निवासासाठीच्या धर्मशाळा, लॉजेस यामधून सर्व उत्पन्न बाजारपेठेस मिळते. तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर तुळजापूर शहरातील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेला आहे. अनेक राज्यांतील भाविक येतात, त्यांच्या निवासाची व्यावसायिकांनी येथे सोय केली आहे.
धाराशिव, सोलापूर, बार्शी आणि लातूर येथून दर अर्ध्या तासाला तुळजापूरसाठी एसटीची बससेवा आहे. याशिवाय खासगी वाहनसेवाही आहे. तर, रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी सोलापूर रेल्वेस्थानक नजीकचे आहे. विमानाने येणाऱ्यांसाठी सोलापूर, लातूर विमानतळ जवळचे आहे.
तुळजाभवानी मातेचा अश्विन महिन्यात नवरात्रोत्सव होतो. पौष महिन्यात शाकंभरी नवरात्रोत्सव पार पडतो. पौष शुद्ध अष्टमी ते पौष शुद्ध पौर्णिमा या कालावधीत शाकंभरी नवरात्रोत्सव पार पडतो. तसेच, चैत्र पौर्णिमेस तुळजाभवानी मातेची चैत्री पौर्णिमा होते. वैशाखी पौर्णिमेस भाविक परंपरेने दर्शनास येतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेस तुळजाभवानी मंदिरात याज्ञवल्क्य उत्सव होतो. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेस तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. तसेच, फाल्गुन पौर्णिमेस तुळजाभवानी मंदिरात होळी पौर्णिमा साजरी केली जाते. तसेच, दिवाळीतील अश्विन अमावास्येस भेंडोळी उत्सव पार पडतो.
तुळजाभवानी मंदिरात अनेक राजांच्या सेवा या आजही चालू आहेत. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून देवीस रोज पहिला अभिषेक तसेच नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच राजा चंदुलाल यांच्यावतीने येथील माधवराव कुतवळ यांच्याकडून दररोज देवीला सकाळ आणि सायंकाळी नैवेद्य दाखविला जातो. तसेच कोल्हापूरच्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आणि निजाम सरकारच्यावतीने, राजा शिवराजबहाद्दूर धर्मवंत धर्मकर्ण यांच्यावतीने मंदिरात अश्विन शुद्ध अष्टमीस होम दरवर्षी परंपरेने केला जातो. त्याचे मानधन मामुल स्वरूपात कोषागार कार्यालयामार्फत देण्याची प्रथा आहे. निजाम सरकारचे राजे शिवराजबहाद्दूर धर्मवंत धर्मकर्ण यांचे होमाचे मानधन येथील कोंडो घराण्यास दिले जाते.
पुण्याचे जितेंद्र भगत हे तुळजाभवानी मातेच्या पालखीचे मानकरी ठरलेत. त्यांनी सांगितले की, 'तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघनासाठी आम्ही अश्विन शुद्ध दशमीस पहाटे पालखी घेऊन तुळजाभवानी मंदिरात येतो. भगत कुटुंबीयांच्या पालखीतूनच तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन होते. तुळजाभवानी मातेस सीमोल्लंघनापूर्वी भगत कुटुंबीयांच्यावतीने पेंड, भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.