

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण हे संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले गाव. नाथांमुळे वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध भूमी म्हणून पैठणची ओळख झाली. संत एकनाथ महाराज यांचा जन्म १५३३ मध्ये पैठण येथे झाला. शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज हे उच्च कोटीचे समाज सुधारक सत्पुरुष, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक. भारुडातून नाथांनी समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा होणारा ‘नाथषष्ठी’ यात्रोत्सव म्हणजे भक्तांना मोठी पर्वणीच होय.
पैठणनगरीत साजऱ्या होणाऱ्या ‘नाथषष्ठी’ यात्रोत्सवाला ४२७ वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी, भाविक पायी दिंडीने दाखल होतात आणि नाथांच्या चरणी माथा टेकून धन्य होतात. वारकरी संप्रदायातील पिढ्यान्पिढ्या चालत आलेला हा यात्रोत्सव आहे.
तत्कालीन काळात अत्याचाराविरुद्ध संत एकनाथांनी संघर्षही केला. समाज सुधारण्यासाठी ‘बये दार उघड’ अशी हाक आई जगदंबे चरणी केली. नाथांनी भारुड, जोगवा, गवळणी, गोंधळ आदी साहित्यांची निर्मिती करून समाजात जनजागृती केली. रंजन व प्रबोधन करत समाजाला दिशा, मार्गदर्शन करण्याचे अमूल्य कार्य केले. या महात्म्याने विपुल लेखन साहित्य निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. ‘ज्ञानेश्वरी’ची प्रत शुद्ध करण्याचे मौलिक कार्यही त्यांनी केले. संत एकनाथ हे महावैष्णव, दत्त भक्त, देवी भक्त होते. जातिवाद, जातिभेद नष्ट करण्यासाठी त्यांचे कार्य अलौकिक आहे. अशा या महान संत एकनाथ महाराज यांनी वद्य षष्ठी शके १५२१ (फेब्रुवारी इसवी सन १५९९) या दिवशी समाधी घेतली. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून साजरा केला जातो.
पैठणमधील साजऱ्या होणाऱ्या नाथषष्ठी यात्रोत्सवाला राज्यभरातून लाखो भाविकांची उपस्थिती असते. पंढरपूरनंतरची ही दुसरी मोठी यात्रा समजली जाते. यात्रेसाठी राज्यभरातून ४७५ पायी दिंडी सोहळे दाखल होतात. तीन दिवस गोदातीरी वाळवंटात फड उभारून भक्तीचा जागर करतात. दिवसरात्र या भक्ती जागराने गोदेचे वाळवंट फुलून जाते.
फाल्गुन षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारण मार्च महिन्यात ही यात्रा भरते) असे यात्रेचे मुख्य दिवस. ‘तुकाराम बीज’च्या मुहूर्तावर यात्रेला औपचारिक सुरुवात होते. गावातील नाथांच्या वाडा मंदिरात साक्षात श्री कृष्णाने पाणी भरून नाथांची सेवा केली, अशी आख्यायिका आहे. भाविकांच्या श्रद्धेचाही हा विषय आहे. त्यामुळेच तुकाराम बीजेपासून गोदावरी नदीचे पाणी घागरीतून आणून हा रांजण भरायला सुरुवात करतात. रांजण भरला की भाग्यवान भाविकाचा मानसन्मान होतो. नाथांचा जयजयकार होतो.
यात्रेच्या पहिल्या दिवशी (षष्ठी) पहाटे नाथांच्या पूजेतील श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला महाभिषेक केला जातो. या दिवशी नाथांच्या वंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी बाराला गावातून संत एकनाथ महाराज मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथवंशज व वारकरी हरिदासी कीर्तन, अभंग सादर करतात, आरती होते. यात्रेसाठी आलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी फडात विसावतात. दुसरा दिवस म्हणजे सप्तमीचा. या दिवशी रात्री बाराला नाथांच्या पादुका असलेल्या छबिन्याची मिरवणूक काढली जाते. मिरवणूक पहाटे गोदाकाठी आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते. यावेळी फडात वारकरी भजन, हरिनामाचा गजर करतात. गोदास्नानानंतर सकाळी सातच्या सुमारास मिरवणूक नाथांच्या वाडा मंदिरात येते. अष्टमी म्हणजे यात्रेचा सांगता दिन. सायंकाळी गावातील मंदिरातून काला दिंडी काढली जाते.
समारोपाची ही दिंडी गोदावरीच्या वाळवंटा मार्गे नाथ समाधी मंदिरात जाते. मंदिरातील नाथांच्या समाधीसमोरील प्रांगणात असंख्य भाविक एकत्र येतात, भक्तीत तल्लीन होतात. सूर्यास्तासमयी नाथांचा जयघोष करत दहीहंडी फोडतात. प्रसाद (काला) घेतल्यानंतर भाविक धन्य होतात. नाथषष्ठी यात्रोत्सवाची सांगता होते. गोदावरी वाळवंटातील फडांमध्येही दहीहंडी फोडून वारकऱ्यांकडून पैठणनगरीचा निरोप घेतला जातो. पायी आलेल्या दिंड्या आपापल्या गावी मार्गस्थ होतात.
नाथांनी केली अडीच वर्षे तीर्थयात्रा नाथांनी अडीच वर्षे उत्तर भारताची भ्रमंती केली. हरिद्वार, ऋषीकेश, गोकुळ, वृंदावन, गया, प्रयाग, काशी, अयोध्या मार्गे शेवटी बद्रीनाथ येथे पोचले. नर्मदा, तापी, गंगा, यमुना, कावेरी आदी नद्यांत पवित्र स्नान केले. त्यावेळी तमोयुगातील परकी यवनांचे अन्याय, अत्याचाराचे अवलोकन जवळून पाहताना नाथांचे मन द्रवित होत होते. येथून नाथ द्वारकेत गेले. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत ते समरस झाले होते. कित्येक साधू, संत, महात्मे यांच्यासोबत त्यांचे विचारमंथन झाले होते. काही काळ संत नरसी मेहता यांच्या जुनागडावर वास्तव्य करून डाकोर येथे जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. नंतर गोदाकाठी चालत नाथांनी आपल्या मातृभूमी, जन्मभूमी पैठणकडे प्रस्थान केले होते.
ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचा अथांग सागर असल्याचे संत एकनाथ महाराजांनी संबोधून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा मोठा गौरव केला आहे. आपण कितीही मोठे असलो तरी मार्गदर्शन करणारा कुणी असला पाहिजे. कोणावरती तरी आपली श्रद्धा, भक्ती असावी ज्यामुळे अहंकारी जीवन नष्ट होऊन जीवनात सुखाचा महामार्ग सापडतो, असे भाव नाथांनी ‘ज्ञानराज माझी माऊली एका जनार्दनाची सावली’ असे वर्णन अभंगात करून व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रतीचे नाथांनी शुद्धीकरण केले. संत एकनाथ महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हाच ऋणानुबंध आहे.
नाथषष्ठी यात्रेनिमित्त दिंडी सोहळ्याची महान परंपरा पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी दिंडी सोहळे उत्साहाने, भक्तिभावाने पैठणनगरीत दाखल होतात. यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलढाणा, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख जिल्ह्यांतून दिंड्या दाखल होण्याची मोठी परंपरा आहे. दिंड्या थांबण्याचे ठिकाणही निश्चित असते. त्यातील वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्याचे काम पैठण नगरपालिका करते. दिंड्या मुक्कामी आल्यानंतर फडांत विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्यामुळे अवघे शहर टाळ-मृदंगाच्या गजराने भक्तिमय होऊन जाते.
- जन्म : इ.स. १५३३ (फाल्गुन व. ६ शके १४५५)
- समाधी : इ.स. १५९९ (फाल्गुन व. ६ शके १५२१)
- ग्रंथ संपदा : ‘एकनाथी भागवत’, ‘अभंगांची गाथा’, ‘रुक्मिणी स्वयंवर’, ‘स्वात्मसुख’, ‘आनंद लहरी’, ‘हस्तामलक’, ‘चिरंजीवपद’, ‘भावार्थ रामायण’, ‘चतुःश्लोकी भागवत’, ‘शुकाष्टक’, ‘हरिपाठ’, ‘ज्ञानेश्वरीचे संशोधन’.
पैठण या तीर्थक्षेत्री नाथांच्या कीर्तनाला खूप मोठ्या जनसमुदायाची आवर्जून उपस्थिती असे. पंढरपुरातही त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच प्रिय ठरली होती. नाथांची वाणी जेवढी रसाळ तेवढीच त्यांची लेखणीही ओघवती होती. कृष्ण भक्ती आणि आत्मबोधाचे वर्णन असलेला ‘रुक्मिणी स्वयंवर’ हा ग्रंथही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो. वासुदेव, वाघ्या-मुरळी, कोल्हाटीण, विंचू, सर्प, दळण, कांडण, जोगवा, गोंधळ, कापडी, पांगळा अशा अनेक नित्य जीवनातील प्रकारांवर नाथांनी भारुड रूपात केलेली मांडणी खूप काही सांगून जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.