भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. महायुती आणि मविआनं जोरदार तयारी सुरू केलेली असताना तिस-या आघाडीचीही जुळवाजुळव सुरू आहे. मात्र या सा-या राजकीय घडामोडी सुरू असताना आता आणखी एक नवी मोट बांधण्याच्या हालचाली छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षानं सुरू केल्या आहेत. संभाजीराजे थेट विधानसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्धार करणा-या मनोज जरांगेंसोबतच आघाडीची मोट बाधण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात संभाजीराजे जरांगेंशी चर्चा करणार असल्यामुळे नव्या आघाडीचे संकेत त्यांनी दिले आहेत.
मराठा आरक्षणासाठी जरांगेंची लढाई राजकीय वळणावर पोहचली आहे. जरांगेंनी थेट विधानसभेच्या सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. त्यासाठी त्यांनी इच्छूकांच्या मुलाखती घेण्याची तयारी सुरू केलीय. मात्र जरांगे बिनबुडाचा लोटा असून विधानसभेला एकही जागा लढवणार नसल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय.
राज्यात प्रस्थापित महायुती आणि मविआला शह देण्यासाठी बच्चू कडू, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, रविकांत तुपकरांसह ओबीसी संघटनांनी विधानसभेची चाचपणी सुरू केलीय. त्यात आता संभाजीराजेंनी जरांगेंशी आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजे आणि जरांगे तिस-या आघाडीसोबत जाणार की स्वत:ची वेगळी मोट बांधणार याबाबत तर उत्सुकता आहेत. मात्र स्वबळावर सर्व विधानसभेच्या जागा लढवण्याची भीमगर्जना करणारे जरांगे राजेंना कसा प्रतिसाद देतात यावर सारी समीकरणं अवलंबून आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.