सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Maharashtra Monsoon Update : जून महिन्यातील पावसाची तूट जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भरून निघाली असली, तरी आता पुढील आठवडाभर राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही पावसाची मोठी तूट असून, तेथे चिंताजनक परिस्थिती कायम असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली आहे.
नेमकी काय आहे सद्यस्थिती?
जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा तब्बल ४८% पाऊस कमी झाला होता. मात्र, १ ते ८ जुलै दरम्यान उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे ही तूट बऱ्याच अंशी भरून निघाली आहे. सद्यस्थितीत कोकण आणि गोवा भागात सरासरीपेक्षा ६% अधिक, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ८% अधिक पावसाची नोंद झाली आहे. येथील परिस्थिती सध्या समाधानकारक आहे. दुसरीकडे, मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागांत परिस्थिती अजूनही बिकट आहे. या दोन्ही भागांत पावसाची तूट अद्यापही वजा ३०% ते ३३% (मायनस ३३ टक्के) इतकी नोंदवली गेली असून येथील बळीराजा अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
बुधवारी कुठे कुठे पाऊस कोसळणार?
छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, रायगड, ठाणे तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
येणारा संपूर्ण आठवडा हा राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडा जाण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक हवामान बदलांमुळे काही ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर नसेल, असे अंदाज पुण्यातील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले.
उद्या मराठवाड्यात पावसाची अजिबात शक्यता नाही. तर विदर्भात काही ठिकाणी केवळ वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडू शकतो, मात्र मुसळधार पाऊस होणार नाही. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील ४ ते ५ दिवस पाऊस उघडीप देईल आणि केवळ हलक्या सरी बरसतील. एकूणच पुढील संपूर्ण आठवडा कोरडा जाण्याचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.