

विधान परिषद निवडणूक निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी
एकनाथ शिंदेंनी तातडीची बैठक बोलावत नेत्यांना दिल्या सूचना
महायुतीतील वादावर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना महत्त्वाचे आदेश
भाजप आणि शिंदेसेनेमध्ये विधान परिषद निकालानंतर वाद वाढला
विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये ५ जागांपैकी फक्त २ जागा जिंकण्यात महायुतीला यश आले. तर महाविकास आघाडीने ३ जागांवर बाजी मारली. या निवडणूक निकालानंतर महायुतीमधील तणाव चांगलाच वाढला आहे. महायुतीमध्ये वादाची ठिणगी उडाली असून भाजप आणि शिंदेसेनेमध्ये वाद सुरू झाला आहे. भाजप नेत्यांनी या निवडणुकीतील पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले जात आहे. आता शिंदेसेनेचे नेते आणि भाजपचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी नेत्यांना हे आदेश दिले.
'दोस्तीत कुस्ती नको', असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला. विधान परिषद निवडणूकीच्या निकालानंतर महायुतीत निर्माण झालेल्या वाद वाढवू नका असे आदेश एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील नेत्यांना दिले आहेत. या निवडणूकीच्या निकालांचे महायुती म्हणून आत्मपरिक्षण करून चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, युतीत वित्तष्ट येणार नाही, आपल्या वादाचा फायदा विरोधकांना होणार नाही याचीही खबरदारी घेतली पाहिजे अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी पक्षातल्या पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या.
या निवडणूकीत महायुती म्हणून काम करताना कोणत्या चुका झाल्या, कोणच्या त्रुटी राहिल्या याबाबतचा एक सविस्तर अहवाल एखनाथ शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागितला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत तसेच वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्याबाबत आम्ही सविस्तर चर्चा करू असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तूर्त पक्षाचे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मित्र पक्षावर टीका करू नका, विसंवाद टाळा आणि एकजुटीने पुन्हा कामाला लागा असेही एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.