कानाला बंदूक,२ राऊंड फायर अन् २७ किलो सोनं गायब! जळगावात चित्रपटालाही शोभेल असा बँक दरोडा, असा उघड झाला कट

SBI bank robbery : जळगावच्या भोकर येथील स्टेट बँकेत चार दरोडेखोरांनी २७ किलो सोने आणि १५ लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह पकडले. या दरोड्याचा कट बडतर्फ पीएसआयने कारागृहात रचल्याचे तपासात समोर आले आहे.
Jalgaon SBI bank robbery latest news
Jalgaon SBI bank robbery latest newsSaam TV
Published On: 

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Jalgaon SBI bank robbery latest news : जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास, दोन दुचाकींवर हेल्मेट व मास्क घालून आलेल्या चार दरोडेखोरांनी रोखपाल व व्यवस्थापकाच्या कानाला एअरगन लावून १५ लाखांची रोकड आणि २७ किलो सोने लुटून पलायन केले. दरम्यान, पोलिसांनी तातडीने पोलिस पाटलांच्या मदतीने अनेक गावांत नाकाबंदी करून चारही दरोडेखोरांना अवघ्या दोन तासांत मुद्देमालासह जेरबंद केले. हा दरोडा टाकण्याचा कट एका बडतर्फ पीएसआयने कारागृहात असतानाच रचल्याचे तपासात समोर आले आहे.

भोकर गावातील हमरस्त्यावर स्टेट बँकेची शाखा आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोन स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या चौघांनी बँकेत घुसून कॅशियर व बँक मॅनेजर जयेश राणे यांच्या कानाला एअरगन लावून त्यांना लॉकर रूममध्ये नेण्यास सांगितले. त्यांनी विरोध केल्यामुळे दरोडेखोरांनी दोन राऊंड फायर केले. त्यानंतर बँकेच्या १६ लॉकरमधील सोन्याचे दागिने व १५ लाखांची रोकड सहा बॅगांमध्ये भरून चोरट्यांनी पलायन केले. ही घटना समजताच, भोकर येथील पोलिस पाटील संभाजी पाटील यांचे सासरे संभाजी पवार यांनी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दिनेश चव्हाण यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील व कंट्रोल रूमला अवगत केले.

परिसरातील करंज, आमोदा-जळगाव, आमोदा-विदगाव आणि भोकर-डिकसाई या चार मार्गांवर ग्रामस्थांच्या मदतीने नाकाबंदी करून पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चारही दरोडेखोरांना मुद्येमालासह पकडण्यात यश मिळवले. दरोडेखोरांच्या दोन दुचाकींचा ग्रामस्थांनी पाठलाग सुरू केल्यावर ते वेगवेगळ्या दिशेने पळाले. धरणगावच्या दिशेने जात असताना चावलखेड्याजवळील रेल्वे पुलावर त्यांनी सोबतच्या चार बॅगा फेकून दिल्या, ज्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.

मास्टरमाइंड बडतर्फ पीएसआयसह चौघे ताब्यात

पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह चारही आरोपींना अटक केली आहे. बडतर्फ पीएसआय शंकर रमेश जासक (रा. खेडी, जळगाव) याने तुरुंगातूनच हा कट रचला होता. त्याच्यासोबत अंकुश श्रवण गुण (रामदेव शवाडी, ता. जळगाव), गजानन राजेंद्र पवार (न्यायडोंगरी, नाशिक) आणि अंकुश तुळशीराम चव्हाण (खापरखेडा) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी गजानन पवार हा चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे प्रेयसीच्या पतीच्या खूनप्रकरणी २०२४ पासून कारागृहात आहे. २०२३ मध्ये जळगावच्या स्टेट बँकेच्या कालिंकामाता शाखेत दरोडा टाकणारा जासक हाच होता. त्यांनी या दरोड्याचा प्लॅन जिल्हा कारागृहात असतानाच आखला होता.

Jalgaon SBI bank robbery latest news
२ आमदारांनी कमळ घेतलं हातात, पण अचानक घेतला यू-टर्न; म्हणाले भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही, २४ तासांत नेमकं काय झालं?

पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची माहिती

पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकर गावातील स्टेट बँकेत चार बंदूकधाऱ्यांनी दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी हेल्मेट परिधान केले होते आणि त्यांच्याकडे पिस्तूल होते. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना मारहाण केली असून, एकाने राऊंड फायर केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी १२ लाख ५० हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि २७ किलो सोने घेऊन पसार झाले होते, परंतु पोलिसांनी अवघ्या दोन तासांत सर्व आरोपींना अटक करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Jalgaon SBI bank robbery latest news
Maharashtra Politics : सरकार लवकरच कोसळणार, कुणी केला दावा? कारणही सांगितले; पाहा व्हिडीओ

यातील प्रमुख आरोपी पोलिस खात्यातून बडतर्फ झालेला आहे. आरोपी शंकर जासकने २०२३ मध्ये शनिपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत स्वतः, वडील, पत्नी आणि भावाच्या मदतीने एक दरोडा टाकला होता. तो रायगड येथे पसंतीवर असताना त्याला बडतर्फ करण्यात आले होते. त्याच्यावर २०१८ मध्ये महाड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अँटी करप्शन) गुन्हा दाखल आहे. तसेच दुसरा आरोपी राजेंद्र याच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल आहे.

यातील तीन आरोपींची जळगाव जेलमध्ये ओळख झाली होती. दरोडा टाकण्यापूर्वी त्यांनी दोनदा बँकेची रेकी केली होती. विशेष म्हणजे, बँकेत एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे असूनही एकही कॅमेरा सुरू नव्हता. या संपूर्ण कारवाईत पोलिसांसोबत नागरिकांनीही रस्त्यावर उतरून आरोपींना पकडण्यासाठी मोठी मदत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.