पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर: घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याच्या मागणीसाठी कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीच्या सहा विक्रेत्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली असून हायकोर्टाने केंद्र सरकार, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय आणि कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार असून प्रतिवादींना आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
तसेच, तोपर्यंत घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे पालन करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, इराण-इस्रायल संघर्षामुळे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, सीरिया आदी देशांतून होणारा तेलपुरवठा बाधित झाला आहे. त्याचा परिणाम एलपीजी उत्पादनावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एलपीजी उत्पादन व घरगुती पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे आदेश जारी केले होते. मात्र कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनी घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, नागपुरात गॅस सिलेंडरच्या संभाव्य तुटवड्याच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. म्हाळगी नगर परिसरात गॅस एजन्सीसमोर घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. गोडाऊनमधून सिलेंडरचा पुरवठा सुरू असून काही वेळापूर्वी सिलेंडरची गाडी आल्यामुळे नागरिकांना सिलेंडर मिळत आहेत.
मात्र, संभाव्य तुटवड्याच्या भीतीने महिला-पुरुष भर उन्हात रांगेत उभे असल्याचे चित्र आहे. गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी बाऊन्सर तैनात करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना पॅनिक होऊ नये, असे आवाहन केले आहे. ऑनलाइन बुकिंगसाठी नंबर लागत नसल्याची तक्रारही अनेक नागरिकांनी केली असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.