संजय गडदे, साम टीव्ही
किराणा दुकानांमध्ये सुट्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या मसाला पावडर आणि मिश्र मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिले आहेत. मसाल्यांमधील भेसळ, प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर आणि अस्वच्छ पद्धतीने होणारे उत्पादन रोखण्यासाठी राज्यात कठोर अन्नसुरक्षा अनुपालन आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार मसाला पावडर आणि मिश्र मसाल्यांचे योग्य पद्धतीने पॅकिंग व सीलिंग करूनच वितरण आणि विक्री करणे आवश्यक राहणार आहे. मसाल्यांच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता, स्वच्छता आणि उत्पादनाचा मागोवा घेता येईल, अशी व्यवस्था बंधनकारक करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
हळद, मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडे, हिंग, गरम मसाला, करी पावडर आणि अन्य मिश्र मसाल्यांच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक व विक्रीशी संबंधित व्यावसायिकांना या आदेशातील लागू तरतुदींचे पालन करावे लागणार आहे. मसाला उत्पादक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते, ई-कॉमर्स व्यवसाय, हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स आणि संस्थात्मक स्वयंपाकगृहांचाही या आदेशात समावेश आहे.
किराणा दुकानांमध्ये मोठ्या डब्यांमधून किंवा पोत्यांमधून ग्राहकांना सुटी मसाला पावडर विकली जाते. मात्र, अशा विक्रीत भेसळ आणि दूषितीकरणाचा धोका लक्षात घेऊन मसाला पावडर व मिश्र मसाल्यांची विनापॅकिंग विक्री रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित नियमांनुसार मसाल्यांचे योग्य पद्धतीने पॅकिंग आणि सीलिंग करूनच त्यांचे वितरण व विक्री करावी लागणार आहे. या निर्णयामुळे मसाल्यांची खुली विक्री करणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या विक्री पद्धतीत बदल करावा लागू शकतो. मात्र, आदेशातील नेमकी अंमलबजावणी, लागू असलेले अपवाद आणि संबंधित नियमांची व्याप्ती यानुसार व्यवसायचालकांनी कार्यवाही करणे आवश्यक राहील.
मसाल्यांना आकर्षक रंग देण्यासाठी किंवा त्यांचे वजन वाढविण्यासाठी भेसळ केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधित घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मेटॅनिल यलो, रोडामाइन बी, सुदान डाईज आणि लेड क्रोमेट यांसारख्या प्रतिबंधित रंगांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा, अनधिकृत स्टार्च आणि अन्य परकीय पदार्थ मसाल्यांमध्ये मिसळण्यास मनाई आहे. निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचे मिश्रण करणे किंवा अर्क काढून घेतलेल्या मसाल्यांची विक्री करणे याविरोधातही कारवाई केली जाणार आहे.
मसाल्यांचे उत्पादन, प्रक्रिया आणि साठवणूक करताना स्वच्छतेचे कठोर निकष पाळावे लागणार आहेत. सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारे, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्यांजवळ मसाले वाळविण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्पादन व साठवणूक परिसर स्वच्छ, कोरडा आणि कीडमुक्त ठेवणे आवश्यक राहील. मसाल्यांसोबत रसायने, कीटकनाशके, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठविण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी इथिलीन ऑक्साइडचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, केवळ कायदेशीररीत्या अनुमत प्रक्रिया वापरण्याचे निर्देश आहेत.
मसाल्यांचे उत्पादन किंवा दळण प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिकांकडे व्यवसायाच्या स्वरूपानुसार वैध FSSAI परवाना अथवा नोंदणी असणे आवश्यक आहे. केवळ व्यापारी परवान्याच्या आधारे मसाल्यांचे उत्पादन किंवा दळण करता येणार नाही. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, वैद्यकीय तंदुरुस्ती आणि आवश्यक प्रशिक्षण यावरही भर देण्यात आला आहे.
मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनाचे नाव, घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, FSSAI परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन किंवा पॅकिंग दिनांक आणि लागू नियमानुसार वापराची अंतिम मुदत अथवा ‘बेस्ट बिफोर’ यांसारखी माहिती नमूद करावी लागणार आहे.
मसाले शुद्ध, नैसर्गिक, सेंद्रिय किंवा आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असल्याचे दावे करताना त्यासाठी आवश्यक पुरावे असणे गरजेचे आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारे खोटे दावे आणि चुकीचे लेबलिंग आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल.
मसाल्यांमध्ये भेसळ आढळल्यास कारवाई केवळ किरकोळ विक्रेत्यापुरती मर्यादित राहणार नाही. संबंधित मसाल्यांचा मूळ उत्पादक, दळण व मिश्रण करणारा व्यावसायिक, पुनर्पॅकिंग करणारा घटक, पुरवठादार आणि प्रतिबंधित रंग किंवा अन्य भेसळयुक्त पदार्थ पुरविणाऱ्यांचाही शोध घेतला जाणार आहे.
यासाठी खरेदी-विक्रीची बिले, उत्पादन नोंदी, बॅच क्रमांक, कच्च्या मालाचे प्रमाण आणि तयार उत्पादनाचा ताळमेळ तपासण्यात येईल. आवश्यकतेनुसार पोलीस आणि अन्य सक्षम यंत्रणांच्या समन्वयाने कारवाई केली जाईल.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील तरतुदींनुसार उल्लंघनाचे स्वरूप आणि गांभीर्य विचारात घेऊन कारवाई केली जाणार आहे. दोषी आढळणाऱ्या व्यवसायांचा साठा जप्त करणे, विक्री थांबविणे, बाजारातून उत्पादन परत मागविणे, परवाना निलंबित किंवा रद्द करणे आणि न्यायालयीन खटले दाखल करणे यांसारख्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
राज्यातील सर्व सहआयुक्त, सहायक आयुक्त, पदनिर्देशित अधिकारी आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मसाला व्यवसायांची तपासणी करून नियमांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणी, नमुने आणि कारवाईची माहिती संबंधित प्रणालीमध्ये नोंदविणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
मसाल्यांमध्ये भेसळ, प्रतिबंधित रंगांचा वापर, अस्वच्छ उत्पादन किंवा चुकीचे लेबलिंग आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा "FDA तक्रार पोर्टल" (https://complaints.mahafda.in) येथे संपर्क साधता येईल. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाची हेल्पलाइन १८०० ११२ १०० तसेच ‘Food Safety Connect’ अॅपचाही वापर करता येईल.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसाय चालकाला कायद्यानुसार जबाबदार धरले जाईल. भेसळीचा मूळ स्रोत शोधून संपूर्ण पुरवठा साखळीची तपासणी करण्यावर प्रशासनाचा भर राहील, असे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.