कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता
जनगणनेच्या कामामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता
अतुल भोसले आणि अविनाश मोहिते गट निवडणुकीसाठी सज्ज
पावसाळ्यानंतर निवडणूक होण्याची चर्चा
सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाची मानली जाणारी रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामामुळे ही निवडणूक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठित साखर कारखान्यांपैकी एक म्हणून कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. कराड, वाळवा, कडेगाव, पलूस आणि खानापूर या पाच तालुक्यांमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. जवळपास पन्नास हजार सभासद असलेल्या या कारखान्यावर भाजपाचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यासाठी प्राथमिक प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते अविनाश मोहिते यांनीही आपला पॅनल सज्ज ठेवला आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते.
मात्र, कारखान्याची निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेतली जाते. त्यामुळे मतदान प्रक्रिया, मतमोजणी आणि इतर व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. सध्या राज्यभर जनगणनेची तयारी आणि प्रशासकीय कामांची लगबग सुरू असल्याने निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. याच कारणामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, निवडणूक पुढे ढकलली गेल्यास दोन्ही गटांना आणखी तयारीसाठी वेळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात कारखान्याच्या राजकारणात आणखी रंगत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.