मुंबई : विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपावरुन राडा झालेला असतानाच डहाणूत बविआला मोठा धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय समीकरणं बदलणार आहेत.
बहुजन विकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुरेश पाडवी यांनी मतदानाला एक दिवस शिल्लक असताना भाजपमध्ये प्रवेश करत भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केलाय. सुरेश पाडवींनी मतदानाचा काही तास शिल्लक असताना पलटी मारली.
डहाणू मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून CPI(M)चे विद्यमान आमदार विनोद निकोले हे उमेदवार आहेत. तर भाजपने विनोद मेढा यांना मैदानात उतरवलं आहे. मागील निवडणुकीत निकोले यांचा 5 हजार मतांनी निसटता विजय झाला होता. सुरेश पाडवी यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक तिरंगी बनली होती. सुरेश पाडवी किती मतं खाणार, त्याचा फटका कुणाला बसणार, याबाबत उत्सुकता वाढली होती.
आता सुरेश पाडवी यांनी या मतदारसंघातून भाजपला पाठिंबा दिल्याने विनोद निकोले विरुद्ध विनोद मेढा अशी थेट लढत होणार आहे. भाजपने हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. मात्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराने ऐनवेळी नांगी टाकल्यामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.त्यामुळे डहाणूतील निवडणूक अधिक रंगतदार ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.