

अजित पवारांच्या विमानाचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय
आमदार अमोल मिटकरी यांनी अपघाताचा फोटो पोस्ट करत व्यक्त केला संशय
विमानाची शेपटी सुरक्षित मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला
अजितदादांच्या विमानाचं शेपूट सुस्थितीत, मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा?, असा प्रश्न त्यांनी विचारला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांसह इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील या अपघाताबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
ही अपघाताची घटना घडल्यापासून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी हे सोशल मीडियावर पोस्ट करत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. आता अमोल मिटकरी यांनी विमान अपघाताचा फोटो शेअर करत ब्लॅक बॉक्ससंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. 'विमानाची टेल पूर्णपणे सुस्थितीत, त्यामुळं ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही.', असे मत मिटकरी यांनी व्यक्त केले.
अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्यांनी विमानाच्या टेल म्हणजेच शेवटीच्या भागाला अॅरोने दाखवत अपघातानंतरही तो सुरक्षित असल्याचे दाखवले. त्यांनी या पोस्टमध्ये ब्लक बॉक्ससंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, 'विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अपघात झालेल्या त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही.'
तसंच 'ब्लॅक बॉक्स असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?' असा प्रश्न उपस्थित करत अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्लॅकबॉक्सवरून राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. 'ब्लॅक बॉक्स पावसापासून, आगीपासून, उन्हापासून, बॉम्ब ब्लास्टपासून सुरक्षित आहे पण राजकारणापासून सुरक्षित नाही. यामध्ये काय राजकारण चालले आहे हे आपल्याला बघावे लागेल. उद्या याबाबतचे आणखी डिटेल आणि माहिती मी तुमच्यासमोर आणेल.', असे रोहित पवार यांनी सांगितले.
तर, काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी सांगितले की, '६० मिनिटं म्हणजे १ तासापर्यंत ११०० डिगरीचे कन्स्टिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी पोहचू शकते. खूप मोठ्या तापमानात ते राहावे यासाठी ड्रायसिलिका बेस्ड मटेरियल वापरले जाते. अॅडिशनल प्रोटेक्टिव लेअर वापरली जाते. अनेक वेळा दोन-दोन वर्षांनंतर देखील ब्लॅक बॉक्स मिळाले आहे. हे म्हणतात ब्लॅक बॉक्स जळाला आहे. पण ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही अशी माहिती समोर येत आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.