

अहिल्यानगरमध्ये २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
हुंड्यासाठी सासरकडून छळ केल्याचा आरोप
आत्महत्येपूर्वी इमोशनल मेसेज सोशल मीडियावर व्हायरल
पती, सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी केली अटक
अहिल्यानगरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. हुंड्यासाठी सुरू असलेल्या अमानुष छळाला कंटाळून एका २३ वर्षांच्या विवाहितेने विहिरीत उडी मारत आयुष्य संपवलंय. राहाता तालुक्यातील एकरुखे गावात ही घटना घडली. प्रिया शुभम ढगे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सुखी संसार करण्याच्या स्वप्नांनी सासरी गेलेल्या प्रियाचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायक ठरला.
घर बांधण्यासाठी माहेरून ४ लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत सासरकडून प्रियाचा सतत छळ केला जात होता. प्रियाचा नवरा शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे हे तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. इतकंच नाही, तर अनेकदा तिला उपाशीपोटीही ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२०२४ पासून सुरू असलेला हा छळ दिवसेंदिवस असह्य होत गेला. अखेर या सगळ्याला कंटाळून प्रियाने टोकाचं पाऊल उचलत विहिरीत उडी घेतली. प्रियाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळळा. या घटनेनंतर एकरुखे गावात शोककळा पसरली असून परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा नवरा, सासरा आणि सासू या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. एका निष्पाप मुलीच्या आयुष्याचा असा दुर्दैवी शेवट झाला. हुंड्याच्या लालसेपायी अजून किती जीव जाणार? हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.
ताई/काकी,
तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, पण आता मला काहीच नको आहे. मी खूप सहन केलं. माझी श्रेया माझ्याजवळ नाही. मी तिला खूप मिस करते पण ती नाही येणार माझ्याकडे. माझा नवरा शुभम , मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, पण त्याने कधीच माझ्यावर तसं प्रेम केलं नाही. त्याचं प्रेम फक्त त्याच्या कुटुंबावर आहे. आज सगळं काही माझ्या सासूमुळे झालं आहे. फक्त आमचं भांडण कसं होईल हेच तिला पाहिजे. ताई श्रेयाची काळजी घे. तुझ्यावर सोपवून जाते मी श्रेयाला. आज जगामध्ये मी नाही. पण शुभमवर प्रेम करत राहील मी. फक्त एकच इच्छा आहे शुभमला विचार मी काय केलं होतं? की ते मला सोडून गेले.
माझी श्रेया मला मम्मी म्हणायची. एक महिना झाला तिला पाहिलंही नाही. खूप मिस करतेय श्रेयाला. सॉरी श्रेया तुझ्यासाठी मी काहीच करू शकले नाही. आज सगळे बोलत आहेत की मी चूकी केली आहे. पण मी चोरी नाही केली. अक्काचे पैसेही नाही घेतले. मला नोकरी करायची होती पण घरचे नाही बोलले. फक्त आता कोणालाही टेन्शन नाही द्यायचे. शुभमला सांगा, करा मजा आता मी गेले तुमच्या लाईफमधून आता. माझी शेवटची एकच इच्छा आहे माझ्या श्रेयाचा सांभाळ कर ताई. आता मला काहीच नको आहे. सॉरी Love you Shreya'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.