

हेपेटायटिस B आणि C हे यकृताला म्हणजेच लिव्हरला होणारे गंभीर संसर्गजन्य आजार आहेत. विशेष म्हणजे अनेक वेळा या आजाराची सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे शरीरात व्हायरचा संसर्ग असूनही संबंधित व्यक्तीला त्याची कल्पना नसते. याच कारणामुळे हेपेटायटिस B आणि C यांना ‘सायलेंट किलर’ असं म्हटलं जातं.
हे दोन्ही आजार व्हायरसमुळे होतात आणि इन्फेक्टेड रक्त तसंच शरीरातील काही द्रवांच्या संपर्कातून त्यांचा प्रसार होऊ शकतो. मात्र, योग्य वेळी तपासणी करून उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. हेपेटायटिस B पासून बचावासाठी लस उपलब्ध आहे. त्याचबरोबर योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीचाही मोठा फायदा होतो.
हेपेटायटिसचा संसर्ग झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखीच लक्षणं दिसतील असं नाही. काही लोकांमध्ये कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत, तर काहींमध्ये पुढील त्रास होऊ शकतात-
लिव्हरला सूज येणं
सतत किंवा नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं
भूक कमी होणं
मळमळ होणं
पोटात दुखणं
डोळे आणि त्वचा पिवळसर होणं
लघवीचा रंग पिवळा होणं
अन्न पचण्यास त्रास होणं
महत्त्वाचे म्हणजे अनेकदा यापैकी एकही लक्षण दिसत नाही. त्यामुळे संसर्ग झालेला असतानाही आजाराची वाढ शरीरात हळूहळू सुरू राहू शकते. या आजारावर दीर्घकाळ उपचार न झाल्यास लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतात. पुढे लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे संशय असल्यास किंवा जोखीम असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे
हा व्हायरस संक्रमित रक्त किंवा शरीरातील इतर द्रवांच्या संपर्कातून पसरू शकतात. काही सामान्य कारणं पुढीलप्रमाणे-
इन्फेक्टेड व्यक्तीचं रक्त शरीरात जाणं
वापरलेली किंवा संक्रमित सुई पुन्हा वापरणं
सुरक्षित तपासणी न केलेलं रक्त चढवणं
टॅटू किंवा पिअर्सिंग करताना अस्वच्छ किंवा वापरलेली सुई वापरणं
सुरक्षिततेची काळजी न घेता लैंगिक संबंध ठेवणं
संक्रमित आईकडून बाळाला संसर्ग होणं
त्यामुळे वैद्यकीय उपचार किंवा कोणतीही प्रक्रिया करताना नवीन आणि स्वच्छ सुई वापरली जात आहे याची खात्री करणे गरजेचं आहे. तसंच दुसऱ्या व्यक्तीचा रेझर, टूथब्रश किंवा सुई वापरू नये. टॅटू किंवा पिअर्सिंग करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळणारं ठिकाणच निवडावं.
रक्त चढवण्यापूर्वी त्या रक्ताची योग्य तपासणी झालेली आहे की नाही, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.
हेपेटायटिस B आणि C दोन्हींसाठी उपचारपद्धती वेगवेगळी असू शकते.
हेपेटायटिस B मध्ये काही रुग्णांना औषधांच्या मदतीने व्हायरसचं प्रमाण नियंत्रणात ठेवलं जातं. त्यामुळे लिव्हरला होणारं पुढील नुकसान कमी करण्यास मदत होते.
हेपेटायटिस C साठी सध्या प्रभावी अँटीव्हायरल औषधं उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेतल्यास अनेक रुग्ण या संसर्गातून पूर्णपणे बरे होऊ शकतात.
मात्र कोणती औषधं घ्यायची, किती काळ घ्यायची किंवा उपचार कधी थांबवायचे, हे डॉक्टरच ठरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं सुरू करणं किंवा मध्येच बंद करणं टाळावं. उपचारादरम्यान सांगितलेल्या तपासण्या नियमितपणे करणंही तितकेच महत्त्वाचं आहे.
हेपेटायटिस B पासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. मुलांपासून प्रौढांपर्यंत आवश्यकतेनुसार लसीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.