Surabhi Jayashree Jagdish
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सततचा मानसिक ताण, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव आणि असंतुलित आहार यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. त्यासोबत धूम्रपान, वाढलेलं वजन, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल यांसारखे घटक कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वाढवतात.
हार्ट अटॅकच्या अनेक घटनांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये चरबी आणि इतर पदार्थांचे थर म्हणजे प्लाक जमा झालेला असतो. हा प्लाक फुटल्यानंतर त्याठिकाणी रक्ताची गुठळी तयार होऊन रक्तप्रवाह अचानक कमी किंवा बंद होऊ शकतो.
हार्ट अटॅकच्या २१ दिवसांपूर्वी काही प्रमाणात लक्षणं दिसून येतात काही रुग्णांमध्ये हार्ट अटॅकपूर्वी काही दिवस किंवा आठवडे छातीत अस्वस्थता, धाप लागणं किंवा असामान्य थकवा यांसारखे त्रास जाणवू शकतात. पण ही लक्षणं दिसतीलच असं नाही.
छातीच्या मध्यभागी दडपण, घट्टपणा, जडपणा किंवा वेदना हे हार्ट अटॅकचे सर्वात महत्त्वाचे संकेत मानले जातात. हा त्रास काही मिनिटं टिकू शकतो किंवा कमी होऊन पुन्हा जाणवू शकतो.
नेहमीच्या तुलनेत कमी कामातच धाप लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं हे हृदयाशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं. हा त्रास छातीत वेदना नसतानाही होऊ शकतो त्यामुळे केवळ छातीत दुखत नाही म्हणून हृदयाचा धोका नाही असं मानू नये.
नेहमीची कामं करताना अचानक जास्त थकवा जाणवणं, अशक्तपणा किंवा चक्कर येणं ही काही व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकची सूचक लक्षणं असू शकतात. महिलांमध्ये असामान्य थकवा आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे विशेषतः लक्षात घेण्यासारखी आहेत.
हार्ट अटॅकचा त्रास फक्त छातीपुरता मर्यादित राहीलच असं नाही. एक किंवा दोन्ही हात, खांदा, पाठ, मान किंवा जबड्यात वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते. यासोबत थंड घाम, मळमळ, उलटी, चक्कर किंवा धडधड यांसारखी लक्षणंही दिसू शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.