

भारतात हाय ब्लड प्रेशर ही दिवसेंदिवस वाढणारी गंभीर आरोग्य समस्या बनतेय. हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी निकामी होणं आणि अकाली मृत्यू यामागे हाय ब्लड प्रेशर हे एक मोठं कारण मानलं जातं. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कौटुंबिक इतिहास. जर आई-वडील, भाऊ-बहिण किंवा जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला हाय ब्लड प्रेशर असेल, तर भविष्यात तुम्हालाही हा त्रास होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते.
नुकतंच यासंदर्भात एक वैद्यकीय संशोधन समोर आलंय. यामध्ये जर जवळच्या व्यक्तीला ब्लड प्रेशरचा त्रास असेल आणि तुमही योग्य ती काळजी घेऊन चांगल्या सवयी लावल्या तर हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी करता येतो. याशिवाय काही प्रमाणात त्यापासून बचावही करता येतो. यावेळी कोणत्या सवयी पाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
हाय ब्लड प्रेशर टाळायचा असेल तर वेळोवेळी रक्तदाब तपासणं खूप गरजेचं आहे. ज्यांच्या कुटुंबात हा आजार आहे त्यांनी लहान वयापासूनच नियमित तपासणी सुरू करावी. घरात डिजिटल बीपी मशीन असल्यास वेळोवेळी रक्तदाब मोजल्याने वाढणारा रक्तदाब सुरुवातीलाच लक्षात येऊ शकतो.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साचतं. त्यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं आणि रक्तदाबही वाढू लागतो. भारतीय आहारात अनेकदा गरजेपेक्षा जास्त मीठ असतं. त्यामुळे स्वयंपाकात मीठ कमी वापरणं, पॅकेज्ड पदार्थांवरील सोडियमचं प्रमाण तपासणं फायदेशीर ठरते.
संशोधनानुसार फळं, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्यं, सुकामेवा आणि बिया यांचा आहारात समावेश केल्यास हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी होण्यास मदत होतो. या पदार्थांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर असतं. त्याचबरोबर प्रक्रिया केलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जास्त तेलकट असलेले पदार्थ टाळावेत.
शरीराचं वजन वाढलं की हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. संशोधनात असं दिसून आलंय की, थोडेसं वजन कमी झालं तरी रक्तदाबावर चांगला परिणाम होतो. विशेषतः कंबरेभोवतीची अतिरिक्त चरबी कमी ठेवणं महत्त्वाचं आहे.
सततचा मानसिक ताण शरीरात काही हार्मोन्स वाढवतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. ध्यान, प्राणायाम, योग, दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम आणि मन शांत ठेवणाऱ्या सवयी तणाव कमी करण्यास मदत करतात. ज्यांच्या कुटुंबात हाय ब्लड प्रेशरचा इतिहास आहे त्यांनी ताण कमी करण्यावर विशेष भर द्यावा.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.