

आपलं हृदय निरोगी आहे की नाही, याचा अंदाज घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर . आज जगभरात लाखो लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. विशेष म्हणजे हा आजार सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणं दाखवत नाही. त्यामुळे त्याला 'सायलेंट किलर' म्हटलं जातं. उपचार न केल्यास हळूहळू हृदय कमकुवत होऊ शकतं आणि पुढे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनीचं नुकसान होण्याचा धोका वाढतो.
मात्र, एक चांगली गोष्ट म्हणजे योग्य काळजी घेतली, नियमित तपासणी केली आणि जीवनशैलीत बदल केले तर रक्तदाब सहज नियंत्रणात ठेवता येतो. त्यासाठी घरी नियमित ब्लड प्रेशर मोजणं गरजेचं आहे. पण अनेकजण ते चुकीच्या पद्धतीने मोजतात. त्यामुळे आलेलं रीडिंगही चुकीचं असू शकतं.
आपलं हृदय शरीरभर रक्त पंप करत असते. हे रक्त जेव्हा रक्तवाहिन्यांमधून वाहते, तेव्हा त्या रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो त्याला ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब म्हणतात. मुळात ब्लड प्रेशरमध्ये दोन आकडे असतात. यामध्ये वरचा आकडा म्हणजे सिस्टोलिक प्रेशर - हृदय आकुंचन पावून रक्त पंप करत असतानाचा दाब. आणि खालचा आकडा म्हणजे डायस्टोलिक प्रेशर - हृदय विश्रांती घेत असतानाचा दाब.
डॉक्टरांच्या मते, योग्य उपचारासाठी सर्वात आधी अचूक ब्लड प्रेशर रीडिंग मिळणं आवश्यक आहे. जर मोजण्याची पद्धत चुकीची असेल तर रीडिंगही चुकीचं येऊ शकतं. त्यामुळे रूग्ण गोंधळात पडून चुकीचे उपचार होऊ शकतात. उपचाराची गरज असूनही ती लक्षात येत नाही.
वरच्या दंडावर (Upper Arm) लावायचं डिजिटल आर्म-कफ मशीन सर्वात विश्वासार्ह मानण्यात येतं.
कफ थेट त्वचेवर लावावा. तो कोपराच्या घडीपासून साधारण एक ते दोन इंच वर बसवावा. कफ सैल नसावा, पण खूप घट्टही नसावा.
ब्लड प्रेशर मोजण्याच्या किमान ३० मिनिटं आधी चहा, कॉफी किंवा कॅफीनयुक्त पेयं पिऊ नयेत.
मोजण्यापूर्वी व्यायाम करू नये.
लघवी रोखून ठेवू नये.
ब्लड प्रेशर मोजण्यापूर्वी ५ ते १० मिनिटं शांत बसून शरीराला विश्रांती द्यावी.
खुर्चीवर सरळ बसावं.
पाठ खुर्चीला पूर्ण टेकलेली असावी.
दोन्ही पाय जमिनीवर सपाट ठेवावेत.
पाय एकमेकांवर ठेवू नयेत किंवा हवेत लोंबकळू देऊ नयेत.
हात टेबलावर किंवा सपाट पृष्ठभागावर ठेवावा.
हाताचा तळवा वरच्या बाजूला असावा.
मोजणी सुरू असताना हलू नये आणि बोलू नये.
आहारातील मीठ कमी करावं.
जास्त मीठ असलेले प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) पदार्थ टाळावेत.
नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवावं.
मद्यपान कमी करावं.
धूम्रपान करत असाल तर ते पूर्णपणे सोडावं.
रोज पुरेशी झोप घ्यावी.
दररोज किमान ३० मिनिटं भराभर चालण्याची सवय लावावी.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.