

किडनीचा कॅन्सर हा अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं दाखवत नाही. त्यामुळे हा आजार ओळखण्यास उशीर होतो. अनेकांना तीव्र वेदना किंवा गंभीर त्रास होत नसल्यामुळे शरीरात होत असलेल्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु शरीर देत असलेल्या अशा शांत इशाऱ्यांकडे वेळेत लक्ष दिल्यास किडनीचा कॅन्सर लवकर ओळखता येऊ शकतो.
अनेक वेळा लघवीत एकदाच रक्त दिसतं आणि नंतर ते पुन्हा रूग्णांना दिसत नाही. त्यामुळे बरेच जण हा प्रकार किरकोळ समजून दुर्लक्ष करतात. पण लघवीत रक्त दिसणं हे कधीही सामान्य मानू नये. डोळ्यांना दिसेल इतकं रक्त असो किंवा तपासणीत आढळलेलं रक्त असो, दोन्ही परिस्थितीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
कंबरेच्या किंवा पाठीच्या खालच्या भागात एका बाजूला सतत दुखणं, जडपणा जाणवणं ही देखील किडनी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. विशेषतः विश्रांती घेतल्यानंतरही हा त्रास कमी होत नसेल, तर त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
लघवीत रक्त दिसणं किंवा पाठीत वेदना होणं म्हणजे किडनीचा कॅन्सरच असतो असं नाही. ही लक्षणं इतर अनेक आजारांमुळेही दिसू शकतात. मात्र त्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घेणं आणि त्यानंतर आवश्यक फॉलो-अप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, अनेक रुग्णांमध्ये किडनीतील ट्यूमर हा दुसऱ्याच एखाद्या आजारासाठी केलेल्या सीटी स्कॅन किंवा इतर तपासणीदरम्यान अचानक लक्षात येतो. कारण त्याआधी कोणतीही ठळक लक्षणे दिसलेली नसतात.
ज्या व्यक्तींना धूम्रपानाची सवय आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांचा रक्तदाब नियंत्रणात नाही अशा व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणं अधिक आवश्यक आहे. कारण अशा लोकांमध्ये किडनी कॅन्सरचा धोका तुलनेने जास्त असू शकतो.
डॉक्टरांच्या मते, किडनी कॅन्सर बराच काळ कोणतीही स्पष्ट लक्षणं न दाखवता वाढत राहू शकतो. त्यामुळे शरीरात हळूहळू होणारे बदल अनेकजण दुर्लक्षित करतात. जर पुरेशी झोप घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल, अचानक वजन कमी होत असेल किंवा ही स्थिती बराच काळ कायम राहत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे.
काही लोकांमध्ये अचानक भूक कमी होते किंवा नेहमीची कामं करतानाही ऊर्जा कमी असल्यासारखं वाटतं. अनेकदा लोक यामागे ताणतणाव, वाढतं वय किंवा व्यस्त दिनक्रम कारणीभूत असल्याचं समजतात. काही वेळा ही लक्षणे किडनीशी संबंधित गंभीर आजारांचे संकेतही असू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, काही रुग्णांमध्ये कोणतंही रक्त वाढवणारं इंजेक्शन किंवा औषध न घेताही हिमोग्लोबिनचं प्रमाण अचानक वाढते. काही वेळा किडनीतील ट्यूमर जास्त प्रमाणात 'एरिथ्रोपोइटीन' हे हार्मोन तयार करतो. त्यामुळे शरीरात लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढतं आणि हिमोग्लोबिन वाढलेलं दिसतं. हेही किडनी कॅन्सरचं दुर्लक्षित राहणारं लक्षण असू शकतं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.